Mumbai News: लॉकडाऊनमुळे सार्वजनिक आणि माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना चालू वर्षात 50 टक्के वाहन कर माफ

या टाळेबंदीच्या कालावधीत सार्वजनिक वाहतूक बंद होती. त्यामुळे विविध वाहतूक संघटनांनी नुकसान भरपाई म्हणून शासनाने करमाफी द्यावी, अशी विनंती केली होती.

एमपीसी न्यूज – कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने वाहतूक क्षेत्राला फटका बसला आहे. त्यांना नुकसान भरपाई म्हणून सार्वजनिक आणि माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना चालू वर्षात 50 टक्के वाहन कर माफी देण्यात येणार आहे.  याबाबतचा निर्णय बुधवारी (दि.26) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

1 एप्रिल 2020 ते 30 सप्टेंबर 2020 या 6 महिन्यांच्या कालावधीतील वाहन कर 100 टक्के माफ करण्यात येणार आहे. सन 2020-2021 या आर्थिक वर्षासाठी एकूण वार्षिक कराच्या 50 टक्के करमाफी देण्यात येणार आहे.

कोविड-19 आजाराच्या साथीमुळे केंद्र शासनाने 25 मार्च 2020 पासून संपूर्ण देशात टाळेबंदी (लॉकडाऊन) घोषित केली आहे. ही टाळेबंदी 31 मे 2020 पर्यंत सुरु होती. त्यानंतर राज्य शासनाने 31 मे 2020 रोजी आदेश काढून Mission Begins Again अंतर्गत काही प्रमाणात टाळेबंदी खुली केली आहे.

या टाळेबंदीच्या कालावधीत सार्वजनिक वाहतूक बंद होती. त्यामुळे विविध वाहतूक संघटनांनी नुकसान भरपाई म्हणून शासनाने करमाफी द्यावी, अशी विनंती केली होती.

करमाफी ही मालवाहतूक करणारी वाहने, पर्यटक वाहने, खोदकाम करणारी वाहने, खासगी सेवा वाहने, व्यावसायिक कॅम्पर्स वाहने, स्कूल बसेस या वार्षिक कर भरणाऱ्या वाहनांना लागू राहणार आहे. यामुळे राज्य शासनाला सुमारे 700 कोटी एवढा कर कमी मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.