Mumbai News : आशा स्वयंसेविकांची दिवाळी होणार गोड ; चार महिन्यांच्या वाढीव मोबदल्यासाठी 57.56 कोटी वितरित

एमपीसी न्यूज – राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जुलै ते ऑक्टोबर 2020 या कालावधीतील वाढीव मोबदला देण्यासाठी 57.56 कोटी रुपये वितरित करण्यात आले आसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दिवाळी सणापूर्वी राज्यातील सुमारे 70 हजार आशा भगिनींना वाढीव मोबदल्याचा लाभ मिळणार असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे याबाबत माहिती देताना असे म्हणाले, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक ह्या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत.

ग्रामीण आरोग्याचा त्या कणा आहेत. त्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णय 25 जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना 1 जुलै पासून प्रत्येकी 2,000 व 3,000 रुपये इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जुलै ते मार्च 2020 या कालावधीतील वाढीव मोबदला अदा करण्यास पावसाळी अधिवेशनात विधिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यास अनुसरुन वित्त व नियोजन विभागाने जुलै ते ऑक्टोबर या कालावधीचे 57.56 कोटीच्या अनुदान वितरणास मान्यता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.