Mumbai News : अभिनेत्री कंगना राणावत मुंबईतील घरी पोहचली… वाचा संपूर्ण घटनाक्रम!

कंगना राणावत मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी कंगनाला 'चले जाव'च्या घोषणा दिल्या.

एमपीसी न्यूज – अभिनेत्री कंगना राणावत अखेर तिच्या मुंबईच्या खारमधील घरी पोहोचली आहे. मोहाली विमानतळावर दाखल होण्याअगोदर तिनं देवाचे दर्शन घेतले व दुपारी बाराच्या सुमारास ती विमानतळावर दाखल झाली. त्यानंतर ‘वाय पल्स’ संरक्षणात मुंबई विमानतळावर दाखल झाली. कंगना राणावत मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी कंगनाला ‘चले जाव’च्या घोषणा दिल्या.

कंगनाचं विमान मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर एका वेगळ्या गाडीत बसवून कंगनाला विमानतळाच्या बाहेर नेण्यात आलं होतं. मुंबई विमानतळाबाहेर मोठी गर्दी जमली होती. शिवसेना, रिपाइं आणि करणी सेनेचे कार्यकर्ते याठिकाणी घोषणाबाजी करत होते.

‘कंगना रणावत पाकिस्तान जाओ’ अशा घोषणा शिवसेनेकडून दिल्या जात होत्या. तर रिपाइं आणि करणी सेनेकडून कंगनाला पाठिंबा देण्यासाठी घोषणाबाजी सुरु होती.

  काय आहे प्रकरण

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत यांच्यात ट्विटर वाॅर सुरू झाले. कंगनाला सर्वस्तरातून टिकेचा सामना करावा लागला व ‘तू केलेल्या विधानाबद्दल माफी माग’, अशी मागणी होऊ लागली.

कंगनाने बॉलीवूड माफीयापेक्षा मुंबई पोलिसांची मला जास्त भीती वाटते, अशा प्रकारचे ट्वीट देखील केले होते. तसेच वारंवार ठाकरे सरकारविरोधात भाष्य देखील तिने केले होते.

कंगना विरोधात जास्त वातावरण पेटल्यानंतर ‘तू परत मुंबईमध्ये पाऊल ठेवू नको’, असा सूर सबंध महाराष्ट्रातून उठत होता. त्यावर कंगनाने ‘नऊ सप्टेंबरला मी मुंबईत येणार असून तुम्हाला काय करायचे ते करा’, असा इशाराही दिला होता.

मुंबई महापालिकेची कारवाई व स्थगिती

मुंबई महापालिकेने बेकायदा बांधकामासंदर्भात कंगना राणावतला नोटीस पाठवली होती. त्यावर आज महापालिकेतर्फे कारवाई करण्यात आली. कंगना राणावतच्या पाली हिल येथील कार्यालयावर BMCने जेसीबी आणि महापालिकेचे कर्मचारी हातोडा घेऊन बांधकाम पाडले.

एका फोटोमध्ये महापालिकेचे कर्मचारी हातोडा चालवताना दिसत आहेत. तो फोटो ट्वीट करून कंगनाने ‘लोकशाहीचा मृत्यू’ असं म्हटलं. या तोडकामाविरोधात कंगनाचे वकील रिझवान सिद्दिकी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. त्यानंतर हे तोडकाम तूर्तास थांबवलं आहे.

‘उद्धव ठाकरे तुमचं गर्वहरण होईल’

मुंबईत पोहोचताच अभिनेत्री कंगना राणावतने ट्विटरला व्हिडीओ शेअर करत मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईवर संताप व्यक्त केला आहे. ‘उद्धव ठाकरे आज तुम्ही माझं घर तोडलं आहे, उद्या तुमचं गर्वहरण होईल’, असं कंगनाने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे कंगनाने पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला आहे.

राजकीय प्रतिक्रिया

‘कंगनाने जे काय विधान केलं, ते विधान बरोबर की चुकीचं याच्या विस्तारात आम्ही जात नाही आणि तिच्या विधानाशी सहमत देखील नाही. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने महिलेला सन्मान देणं शिकवलं, महिलेचं संरक्षण करणं शिकवलं आहे. मात्र, हे लांडग्यासारखे मागे लागले आहेत, कंगनाच्या’, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

भाजपा नेते राम कदम, प्रवीण दरेकर यांनी सूड भावनेने कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पालिकेच्या कारवाईवर भाष्य केलं असून संशय निर्माण होण्यास आपण संधी देत असल्याचं म्हटलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.