Mumbai News: समाजाच्या विकासासाठी भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करणार- आदित्य ठाकरे

Mumbai News: Aditya Thackeray will recommend dignitaries who have made significant contribution for the development of the society for Padma awards वेगवेगळ्या क्षेत्रात अत्युत्कृष्ट कामगिरी करुन योगदान देणाऱ्या मान्यवरांची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस केली जाते.

एमपीसी न्यूज – राज्याच्या आणि समाजाच्या विकासासाठी भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांची या पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करुन त्यांच्या कार्यास उचित सन्मान देण्यासाठी समिती काम करेल, असे समितीचे अध्यक्ष राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

पद्म पुरस्कार शिफारस समितीची पहिली बैठक गुरुवारी (दि.13) सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे समितीचे अध्यक्ष राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

बैठकीस समितीचे सदस्य उद्योग, खनिकर्म आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राजशिष्टाचार राज्यमंत्री आदिती तटकरे, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकर उपस्थित होते. समिती सदस्य राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले.

26 जानेवारी 2021 रोजी घोषित होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी राज्यातील मान्यवरांच्या नावाची केंद्र शासनाकडे शिफारस करण्यासाठी ही समिती गठित करण्यात आली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात अत्युत्कृष्ट कामगिरी करुन योगदान देणाऱ्या मान्यवरांची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस केली जाते. बैठकीत या अनुषंगाने चर्चा झाली.

राज्यातून मागील काही वर्षांमध्ये केंद्राकडे शिफारस करण्यात आलेले प्रस्ताव आणि त्यापैकी प्रत्यक्ष पुरस्कार किती मिळाले याची माहिती घेऊन त्या अनुषंगाने विश्लेषण करण्यात यावे, अशा सूचना यावेळी विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

महाराष्ट्र हे देशातील प्रगत, सुधारणावादी राज्य आहे. राज्यात विविध क्षेत्रात कार्य करुन समाजाच्या आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक मान्यवरांनी योगदान दिले आहे. अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांची समितीमार्फत पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करण्यात येईल, जेणेकरुन केंद्र शासनाकडूनही त्यांच्या कामाची देखल घेतली जाईल, अशी चर्चा यावेळी झाली.

समितीच्या निवडीचा शासन निर्णय दोन दिवसांपूर्वी निर्गमित करण्यात आला. पण या विषयाचे महत्त्व लक्षात घेता समितीने लगेच दोन दिवसांत पहिली बैठक घेऊन चर्चा केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.