Mumbai News : ‘कर्तव्य बजावताना कोरोनाने मृत्यू झालेल्या 17 अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत’

एमपीसीन्यूज : कर्तव्य बजावताना कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झालेल्या ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीच्या विविध पदावरील 17 अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची विमा रक्कम अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला असून संबंधीत कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

मुश्रीफ म्हणाले की, कोरोना संकटकाळात ग्रामीण पातळीवरील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्त्या, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, सीएससी कंपनीचे केंद्र चालक, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत कंत्राटी पद्धतीवरील कर्मचारी, कामगार, जिल्हा परिषद कर्मचारी यांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले होते.

हे सर्व कर्मचारी कोरोना संक्रमण काळात ग्रामीण भागातील संक्रमण रोखण्यासाठी जीवाची बाजी लावून काम करत होते. लोकांमध्ये जावून जनजागृती करत होते. माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानाची अंमलबजावणी करण्यामध्ये या कर्मचाऱ्यांनी महत्वाचे योगदान दिले.

गृहभेटी करणे, ऑक्सीमीटर-थर्मामीटर आदींच्या सहाय्याने लोकांची तपासणी करणे अशी विविध कामे करताना कर्तव्यावर असताना दुर्दैवाने काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला. अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदत देण्यात येत आहे.

प्राप्त प्रस्तावांपैकी मुकेश वणवे, रोजंदारी मजुर (जि. भंडारा), बाळासाहेब वैराळ, ग्रामविकास अधिकारी (जि. अहमदनगर), रमेश गोळे, ग्रामपंचायत कर्मचारी (जि. पुणे), श्रीराम गवारे, ग्रामविकास अधिकारी (जि. ठाणे), बबन तरंगे, शिपाई कम क्लार्क (जि. पुणे), मारुती पारींगे, वाहन चालक (जि. रायगड), राहूल कांबळे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी (जि. सांगली), नरेंद्र बावा, ग्रामविकास अधिकारी (जि. जळगाव), प्रकाश सोनवणे, ग्रामविकास अधिकारी (जि. पुणे), लक्ष्मण टिपुगडे, नळ पाणीपुरवठा कर्मचारी (जि. कोल्हापूर), सुनिल शेंडे, विस्तार अधिकारी (जि. नागपूर), सतिश फेरन, ग्रामपंचायत कर्मचारी (जि. अमरावती), संतोष धाकड, ग्रामसेवक (जि. अमरावती), परशुराम बढे, ग्रामपंचायत कर्मचारी (जि. पुणे), दिलीप कुहीटे, विस्तार अधिकारी (जि. नागपूर), सुभाष गार्डी, शिपाई (परिचर) (जि. सातारा), आणि प्रशांत अहिरे, ग्रामसेवक (जि. अहमदनगर) या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कर्तव्य बजावताना कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाला.

या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपये इतकी विमा कवच मदत देण्यास मान्यता देण्यात आली आहे. लवकरच जिल्ह्याचे पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारी किंवा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते मदतीचे वितरण करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

घरातील कमावती व्यक्ती गमावल्याने संकटात सापडलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या संकटकाळात मदत देण्याचा हा प्रयत्न आहे.

याशिवाय कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या इतर अधिकारी, कर्मचारी यांच्या वारसांना विमा कवच मदत मिळण्यासाठीचे प्रस्ताव 30  नोव्हेंबरपर्यंत पाठविण्याच्या सूचना जिल्हा परिषदांना देण्यात आल्या असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.