Mumbai News : भाजपशी जुळवून घ्या, काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेला कमकुवत करतेय – प्रताप सरनाईक यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

एमपीसी न्यूज – शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहिलं आहे. या पत्रात प्रताप सरनाईक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेला कमकुवत करत असल्याचा दावा करत, भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं आहे. ईडीची चौकशी मागे लागल्यानंतर आता या पत्रामुळे प्रताप सरनाईक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन पानी पत्रं लिहून आघाडीतील मित्र पक्षांवर हल्ला केला आहे तसेच, भाजपशी पुन्हा जुळवून घेण्याचे आवाहन केले आहे. सत्तेत असलेले राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असा दावा सरनाईक यांनी केला आहे.

काय म्हंटलय पत्रात ?
एकीकडे आपण राजकारण बाजूला ठेऊन फक्त आणि फक्त आपल्या मुख्यमंत्री पदाला प्रामाणिकपणे न्याय देत आहात. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांना वाटत आहे. त्यात काँग्रेस पक्ष “एकला चलो रे” ची भूमिका घेत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या पक्षाचे नेते कार्यकर्ते फोडण्यापेक्षा शिवसेनेचे नेते कार्यकर्ते फोडत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच महाविकास आघाडीतील काही मंत्री व काही सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा आपल्या पाठीमागे लागू नये म्हणून केंद्रातील सत्ताधारी पक्षासह आपल्या नकळत छुपी हातमिळवणी करीत आहेत हेही आपल्या निदर्शनास आणून देत आहे.

त्याचबरोबर गेल्या दीड वर्षात आपल्या पक्षाच्या अनेक आमदारांशी मी चर्चा केल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे झटपट होतात, मात्र आपला मुख्यमंत्री असूनही शिवसेना आमदारांची कामे होत नाहीत” अशी काही आमदारांची अंतर्गत नाराजी आहे. एका विशिष्ट परिस्थितीत राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. भाजपशी युती तोडून शिवसेना पक्षाने, काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी महाविकास आघाडी” स्थापन केली की काय ? अशी चर्चा आहे. साहेब, आमचा तुमच्या नेतृत्वावर अढळ विश्वास आहे. कोरोना काळात आपण प्रचंड मेहनत घेऊन कुटुंबप्रमुख म्हणून महाराष्ट्र राज्याचा संभाळ केला आहे. त्याबद्दल आपले खरोखर कौतुक करावे तितके कमी आहे.

महाराष्ट्र राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविणार हा वंदनीय शिवसेनाप्रमुख माननीय श्री. बाळासाहेबांना दिलेला शब्द व त्यांना दिलेले वचन पूर्ण झालेले आहे. आपण या पदाला न्याय दिला आहे व देत आहात. पण या परिस्थितीतही जे राजकारण सुरु आहे त्यात सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे.

कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा दलाल व शिवसेनेमुळे “माजी खासदार” झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरु आहे त्यालाही कुठे तरी आळा बसेल. आम्हाला टार्गेट करीत असताना आमच्या कुटुंबियांवर सुद्धा सतत आघात होत आहेत, खोटे आरोप होत आहेत. एका केसमधून जामीन मिळाला की तात्काळ जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंतवणे, त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या केसमध्ये गुंतवणे अशा प्रकारचे जाणीवपूर्वक काम या तपास यंत्रणा करीत आहेत. आपल्या एका निर्णयामुळे हे कुठेतरी थांबेल.

युद्धात लढत असताना अभिमन्यूसारखे लढण्यापेक्षा किंवा कर्णासारखे बलिदान देण्यापेक्षा, धनुर्धारी अर्जुनासारखे लढावे असे मला वाटते. त्यामुळे राज्यात आपली सत्ता असताना सुध्दा व राज्य शासनाचे किंवा इतर अन्य कुठल्याही नेत्याचे सहकार्य मिळाले नसताना कुणालाही त्रास न देता मी माझी कायदेशीर लढाई माझ्या कुटुंबासह गेले 7 महिने लढत आहे.

पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी प जुळवून घेतलेले बरे होईल. तर त्याचा फायदा आमच्या सारख्या काही कार्यकर्त्यांना व शिवसेनेला भविष्यात होईल असे मला वाटते. साहेब, आपण योग्य तो निर्णय घ्यालच. माझ्या मनात असलेल्या भावना या पत्राद्वारे कळविल्या आहेत. लहान तोंडी मोठा घास घेतलाय, काही चुकले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. असे प्रताप सरनाईक यांनी पत्रात म्हंटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.