Mumbai News : अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ, दाखल झाला आणखी एक गुन्हा

एमपीसी न्यूज – रिपब्लिक टीव्हीचे संपादक पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अडचणींत आणखी भर पडली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गोस्वामी यांच्यावर मुंबईतील ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी आज अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानातून अटक करण्यात आली. पोलिसांकडे अर्णब यांच्या अटकेसाठी रितसर वॉरंट होता आणि त्यानुसारच पोलिसांनी कारवाई केली.

मात्र, या कारवाईदरम्यान अर्णब यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना विरोध करण्यात आला. कारवाईवर आक्षेप घेण्यात आला. त्यामुळेच अर्णब यांच्याविरुद्ध पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

अर्णब यांना अटक करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यात अर्णब हे पोलिसांशी हुज्जत घालताना व अटकेस मनाई करताना दिसत आहेत. दरम्यान, गोस्वामी यांना अटकेनंतर थेट अलिबाग कोर्टात हजर करण्यात आले तिथे अर्णब यांच्या वकिलांनी पोलिसांवर आरोप केले.

पोलिसांनी अटकेची कारवाई करताना मारहाण केली तसेच, दोन जणांनी मला मागून पकडले आणि दोन पोलिसांनी मला मारहाण केली. माझ्या मुलाला व कुटुंबीयांनाही मारहाण करण्यात आली, असा दावा अर्णबच्या वकिलांकडून कोर्टात करण्यात आला. हा आरोप पोलिसांनी फेटाळला आहे.

दरम्यान, अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी अर्णब गोस्वामी यांच्यामुळेचं अन्वय नाईक यांनी आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. अन्वय नाईक यांनी सुसाइट नोटमध्ये तीन जणांची नाव लिहून ठेवली होती. तरीदेखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही.

पोलिसांनी केलेल्या कारवाईची आम्ही स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया अन्वय यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.