Mumbai News: नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आणखी तीन हजार रुपयांचे अर्थसहाय्य

Mumbai News: Another Rs 3,000 financial assistance to registered construction workers या निर्णयाचा फायदा राज्यातील 10 लाख बांधकाम कामगारांना मिळणार असून सदर अर्थसहाय्य वाटपावर मंडळामार्फत 300 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीकृत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांना आणखी 3 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. बांधकाम कामगारांच्या खात्यात दुसरा हप्ता मंजूर करण्याबाबत कामगार मंत्री यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला आहे.

या निर्णयाचा फायदा राज्यातील 10 लाख बांधकाम कामगारांना मिळणार असून सदर अर्थसहाय्य वाटपावर मंडळामार्फत 300 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

कोविड -19 या विषाणूच्या प्रादूर्भाव कालावधीत 2 हजार रुपयाच्या अर्थसहाय्याचा पहिला हप्ता एप्रिल 2020 मध्ये मंजूर करण्यात आला होता. या निर्णयानुसार जुलै 2020 पर्यंत राज्यातील 9 लाख 14 हजार 748 बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात अर्थसहाय्याची रक्कम जमा करण्यात आली. यासाठी मंडळाने 183 कोटी रुपये खर्च केले.

सध्या राज्यात लॉकडाऊन कालावधीला टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. तथापि, इमारत व इतर बांधकामे अद्यापही पूर्ववत सुरू झालेली नाही त्यामुळे बांधकाम कामगांराना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब विचारात घेऊन नोंदणीकृत बांधकाम कामगारांना 3 हजार रुपयाचा अर्थसहाय्याचा दुसरा हप्ता मंजूर करण्याचा निर्णय कामगार विभागाने घेतला.

आज घेतलेल्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी सुरू होणार असून याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळास देण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.