Mumbai News : मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा स्वीकारताच भाई जगतापांचा स्वबळाचा नारा

एमपीसी न्यूज – मुंबई शहर काँग्रेसची अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर पडताच भाई जगताप यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे संकेत दिले आहे. पुण्यामध्ये बोलताना त्यांनी काँग्रेसचा झेंडा अंगाखांद्यावर घेऊन विभागामध्ये काम करणार्‍या कार्यकर्त्यांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वच्या सर्व म्हणजे 227 जागा स्वबळावर लढण्याचा विचार असल्याचे सांगितले.

अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर भाई जगताप यांनी जेजुरीत जाऊन खंडेरायाचे दर्शन घेत भंडारा उधळला. त्यानंतर मुंबईच्या दिशेने जात असताना त्यांनी पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना भाई जगताप म्हणाले, आघाडी असताना नेहमीच जागावाटपावरून अडथळा आणि अडचणीला तोंड द्यावे लागते. पण मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने मुंबई महापालिकेच्या सर्वच्या सर्व म्हणजे 227 जागा काँग्रेसने लढवाव्यात असे माझे मत असल्याचे त्यांनी सांगितले. आणि त्यासाठी मी आग्रही राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचा झेंडा अंगाखांद्यावर घेऊन मुंबईच्या गल्लीबोळात फिरणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा विचार करून हा निर्णय घ्यावा लागणार असल्याचेही भाई जगताप यांनी स्पष्ट केले.

पक्षनेतृत्वाने माझ्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. आणि मी याकडे आव्हान म्हणून पाहत आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते मिलिंद देवरा प्रिया दत्त संजय निरुपम या सर्वांना सोबत घेऊन मुंबईमध्ये काँग्रेस मजबूत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.