Mumbai News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेला संबोधित करणार

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (शुक्रवारी) रात्री साडे आठ वाजता जनतेला संबोधित करणार आहेत. महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री लॉकडाऊन बाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शनिवारपासून पुण्यात बारा तासांचा नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. पुढील सात दिवसांसाठी पुण्यात बस, धार्मिक स्थळं, हॉटेल बंद राहणार आहेत.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. दररोज चाळीस हजार रुग्ण वाढत आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी टास्क फोर्स सोबत झालेल्या बैठकीत लॉकडाऊनची तयारी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. तसेच काही जिल्ह्यात निर्बंध कडक करण्यात आले. तसेच, राज्यात रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली. मात्र, रुग्ण संख्या अधिक वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे.

नागरिकांनी सूचनांचे पालन न केल्यास लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पुण्यात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पुण्यात अंशतः लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.