Mumbai News : कंत्राटी कामगार संघाचा आझाद मैदानात उद्रेक

एमपीसी न्यूज – वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांबाबतीत विविध आंदोलन, पत्र व्यवहार सनदशीर मार्गाने शासन/प्रशासन पातळीवर प्रयत्न करून शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने लक्षवेधी आंदोलन आझाद मैदानात करण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख प्रतिनिधींसह हजारो कामगार उपस्थित होते.

कामगारांना भरतीमध्ये प्राधान्य मिळावे, वयात सवलत मिळावी, आरक्षण मिळावे, शासनाच्या निकशानुसार वीज कंपनीतील भरतीमध्ये वयोमर्यादेत देखील वाढ करावी, विद्युत सहाय्यक ही भरती SSC च्या मार्क मेरिट नुसार न लावता ITI वीजतंत्री व तारतंत्रीच्या मेरिट नुसार करावी. कोरोना काळात शहीद झालेल्या 26 कंत्राटी कामगारांना आर्थिक मदत मिळावी, त्यांच्या वारसाला नोकरी मिळावी, कामगार कपातीचे धोरण रद्द करून आज कार्यरत अनुभवी कंत्राटी कामगाराचा रोजगार जाणार नाही याची ना.ऊर्जामंत्री व प्रशासनाने लिखित खात्री द्यावी. कंत्राटदारांच्या चौकश्या व्हाव्यात, या मागण्या साठी हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने ऊर्जा उपसचिव मा. वाळुंज, यांनी संघटनेच्या शिष्ट मंडळास पाचारण केले यामध्ये कामगार महासंघाचे मार्गदर्शक अण्णा देसाई, अध्यक्ष नीलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, संघटन मंत्री राहुल बोडके, उपाध्यक्ष सुनील कांबळे उपस्थित होते. यावेळी लवकरच मंत्रालयात वरिष्ठ पातळीवर बैठक आयोजित करून कंत्राटी कामगारांच्या मागण्याबाबतीत निर्णय करण्यात येईल असे आश्वासन दिले.

महाराष्ट्रातील वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांचे मागण्याबाबतीत त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा संघटनेला राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल असा इशारा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ ) चे अध्यक्ष नीलेश खरात यांनी दिला आहे.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष नीलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष उमेश आणेराव, संघटन मंत्री राहुल बोडके, कोषाध्यक्ष सागर पवार, उपाध्यक्ष अमर लोहार, तात्या सावंत इतर विविध जिल्हा पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.