Mumbai News : कारखान्यांच्या ठिकाणी ‘कोविड दक्षता समिती’ स्थापन करावी – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज – गेल्या सव्वा वर्षाहून अधिक काळ आपण कोविड संसर्गाशी लढत आहोत. येणाऱ्या वर्षभरात कोविड संसर्गाशी मुकाबला करीत असताना राज्यातील उद्योगधंदे सुरु राहण्याबरोबरच राज्याचे अर्थचक्र सुरु राहणे आवश्यक आहे. त्यामुळे कामगारांची सुरक्षा आणि त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत कारखान्यांच्या ठिकाणी ‘कोविड दक्षता समिती’ स्थापन करण्यात यावी, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कामगार संघटनांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. या बैठकीस कामगार मंत्री हसन मुश्रीफ, खासदार अरविंद सावंत, आमदार भाई जगताप, आमदार शशिकांत शिंदे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद- सिंघल, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांच्यासह राज्यातील कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोविडशी लढा सुरु असताना राज्याची अर्थव्यवस्था सुरु राहणे आवश्यक असून येणाऱ्या काळात आपण सर्वांनी कोविड सुसंगत वर्तणूक आत्मसात करणे आवश्यक आहे. कामगार संघटनांनी यासाठी पुढाकार घेऊन कामगारांना काही महत्वपूर्ण नियमाचे पालन करणे व त्याचे महत्व पटवून देणे आवश्यक आहे.आता आलेली कोविड संसर्गाची दुसरी लाट परतवून लावत असताना तिसरी आणि चौथी अशी कोणती लाट येऊ नये यासाठी दक्ष राहणे आवश्यक आहे.

कामगारांची सुरक्षा आणि आरोग्य याला प्राधान्य देत असताना कामगारांना कंपनीच्या आवारात तात्पुरते राहण्याची सोय करता येईल का, कामगारांच्या कामाच्या पाळ्या कशा सुधारित करता येतील यासाठी कामगार संघटनांनी पाठपुरावा करावा असे मुख्यमंत्री म्हणाले. कामगार संघटनांनी पुढाकार घेऊन कारखानदारांमार्फत कामगारांचे लसीकरण होईल यासाठी पाठपुरावा करावा. कारखानदारांनी कामगारांची आरटीपीसीआर तपासणी कंपनीत करण्याबरोबरच त्यांच्यासाठी विलगीकरण कक्ष तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी कामगार संघटनांनी प्रयत्न करावेत. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना रोजगार मिळेल यासाठीही संघटनांनी प्रयत्न करावेत असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.