Mumbai News : गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचे पत्र स्वीकृतीसाठी राज्यपालांकडे

एमपीसी न्यूज : अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने या विभागाचा कार्यभार दिलीप वळसेपाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा, असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे.

गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा, असेही या पत्रात म्हटले आहे. वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली आहे.

राज्य पोलीस दलात मागील काही दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडत आहेत. मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या घराबाहेर स्फोटके असलेली कार आढळली. त्यात एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आढळला. त्यानंतर राज्याचे माजी पोलीस महासंचालक परमबीर सिंग यांची बदली केल्यानंतर त्यांनी सरकार विरोधात न्यायालयात धाव घेतली. त्यातच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोट्यवधी रुपयांच्या वसुलीचे पोलिसांना टार्गेट दिले असल्याचे आरोप सिंग यांनी केले. या सर्व प्रकरणात राज्यातील राजकारण ढवळून निघाले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षाच्या वतीने करण्यात आली. शेवटी न्यायालयाने अनिल देशमुख यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर देशमुख यांनी आपण स्वतःहून गृहमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले.

या सर्व प्रकारानंतर देशमुख यांचा राजीनामा स्वीकारून गृह विभागाची जबाबदारी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे द्यावी याबाबतचे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पाठवले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.