Mumbai news: एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार?; राष्ट्रवादी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात…

एमपीसी न्यूज – भाजपवर नाराज असलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची आज (बुधवारी) दिवसभर चर्चा सुरू होती. पण, जळगाव येथील जलसिंचन प्रकल्पाबाबत चर्चा झाल्याचे सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ते वृत्त फेटाळले. तसेच जर तर वर आपण बोलत नसल्याचे सांगितले. तर, भारतीय जनता पार्टीला कुठलंही नुकसान पोहचेल, असा निर्णय नाथाभाऊ खडसे घेणार नाहीत, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. याबाबत मला काही माहिती नसल्याचेही खडसे यांनी सांगितले.

उत्तर महाराष्ट्रातील भाजपचा मोठा नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर असल्याची माहिती सकाळी समोर आली. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या नावाची जोरदार चर्चा राज्यात सुरू झाली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची खलबत देखील झाली.

मुंबईत शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर, अनिल पाटील यांच्यात चर्चा झाली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागलेले भाजपचे मोठे नेते हे एकनाथ खडसे आहेत का, अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती.

मात्र, या बैठकीत जळगावातील जलसिंचन प्रकल्पाबाबत चर्चा झाली. एकनाथ खडसे यांच्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याबद्दल अनेक वेळा अशा अफवा उठल्या आहेत. पण, भारतीय जनता पार्टीला कुठलंही नुकसान पोहचेल असा निर्णय नाथाभाऊ खडसे घेणार नाहीत, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

एकनाथ खडसे हे आमचे जुने-जाणते आणि ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे नाथाभाऊ असा कोणताही निर्णय घेणार नाहीत. ज्यामुळे पक्षाला नुकसान पोहचेल, असे पाटील म्हणाले.

दरम्यान, भाजपमध्ये आपल्याला सातत्याने डावलले जात असल्याची एकनाथ खडसे यांची भावना आहे. त्यातून ते गेल्या अनेक दिवसांपासून अस्वस्थ आहेत. एकनाथ खडसे यांनी आपली नाराजी अनेकदा जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवली आहे.

मात्र, पक्षाच्या नेत्यांकडून कुठल्याही पद्धतीने विचारणा केली नाही किंवा कारवाई देखील केली नाही. गेल्या काही दिवसांपासून ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ले चढवत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.