Mumbai News : राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक, लॉकडाऊन बाबत निर्णय होण्याची शक्यता

एमपीसी न्यूज – राज्य मंत्रिमंडळाची आज तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. आज दुपारी 3 वाजता ही बैठक होणार असून सर्व मंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला उपस्थित असतील. कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याने लॉकडाऊन बाबत या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

राज्यात कोरोनाचा प्रकोप झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने राज्यातील अनेक शहरांमध्ये संचारबंदी घालण्यात आली आहे. 2 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या संवादात येत्या दोन दिवसात लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार असल्याचं म्हटलं होतं.

आज मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्यात परिस्थिती आणखी बिघडली तर संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, राज्यात काल पुन्हा विक्रमी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात काल तब्बल 49 हजार 447 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यात एकूण 4 लाख 01 हजार 172 सक्रीय रुग्ण आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.