Mumbai News: रेमडेसीविर इंजेक्शनचे दर निश्चित; आता खासगी रुग्णालयात मिळणार ‘या’ किमतीत

एमपीसी न्यूज – कोरोनाबाधितांना उपयुक्त ठरत असलेल्या रेमडेसीविर इंजेक्शनचे दर राज्य सरकारने निश्चित केले आहेत. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना 2360 रुपयांना हे इंजेक्शन मिळणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक औषध केंद्र निश्चित करण्यात आले असून, राज्यामध्ये 59 औषध केंद्र निश्चित करण्यात आली आहेत.

राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये हे औषध मोफत उपलब्ध आहे. मात्र, खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना हे औषध मिळत नाही. तसेच ते महाग मिळत असल्याच्या तक्रारी होत्या.

त्यासाठी खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना निश्चित केलेल्या दरात रेमडेसीविर उपलब्ध होण्याकरीता अन्न व औषध प्रशासनामार्फत प्रत्येक जिल्ह्यातील खाजगी औषधी केंद्रे निश्चित केली आहेत.

यासाठी राज्यामध्ये 59 औषध केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये अमरावती विभागात 5, कोकण विभागात 10, नागपूर विभागात 6, औरंगाबाद विभागात 11, नाशिक विभागात 9, बृहन्मुंबई विभागात 5 आणि पुणे विभागात 13 औषध विक्रेते निश्चित करण्यात आले आहेत.

इंजेक्शनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णालयाने त्याबाबत प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे. त्यासोबत प्रिस्क्रिप्शन, रुग्णाचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट, आधार कार्ड किंवा छायाचित्र असलेले परवाना अथवा प्रमाणपत्र तसेच रुग्णाची वैद्यकीय माहिती कळविणे आवश्यक आहे.

रुग्णांना वेळेवर, वाजवी किंमतीत रेमडेसीविर इंजेक्शन मिळावे यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांनी दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी संबंधितांना पत्राद्वारे केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III