Mumbai News : ‘देशाने पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवताना आणि गृहमंत्री ‘हप्ता वसुली’ करताना पाहिलं’ – जावडेकर

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (सोमवारी) आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला. नैतिकतेचे कारण देत त्यांनी राजीनामा देत असल्याचे आपल्या पत्रात म्हटले आहे. भाजप नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे तर, काही नेत्यांनी सडकून टीका देखील केली आहे.

केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, ‘अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे उद्धव ठाकरे सरकारचं पितळ उघडं पडलं. देशाने पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवताना आणि गृहमंत्री ‘हप्ता वसूली’ करताना पाहिलं’ असं ट्विट प्रकाश जावडेकर यांनी केले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘ अनिल देशमुखांचा राजीनामा उच्च न्यायालयाच्या निकालानंतर ही झाला नसता, तो शरद पवारांच्या एका आदेशावर झाला. जोपर्यंत राजकारणात आणि समाजकारणात चुकेल त्याला शिक्षा हा पायंडा पडत नाही तोपर्यंत लोकशाही सुदृढ होणार नाही. 15 दिवसांच्या सीबीआय चौकशीत अनेक विषय बाहेर येतील. सचिन वाझे एनआयए चौकशीत जे बोलले आहेत, ते तर अजून बाहेर यायचंच आहे. परंतु सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरून विश्वास उडेल अशा घटना गेल्या काही काळात राज्यात घडल्या आहेत’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं, परमवीर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख शरद पवारांना भेटले. सीबीआय चौकशी करणार असेल तर मी राजीनामा देऊ इच्छितो असं अनिल देशमुखांनी पवारांना सांगितलं. त्याला पवारांनी होकार दिला. गृहमंत्री पदाची जबाबदारी सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडेच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्री यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले आहेत. यावेळी न्यायालयाने 15 दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचा आदेश सीबीआयला दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.