Mumbai News: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा – मुख्यमंत्री

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी. : Ganeshotsav should be celebrated simply on the backdrop of Corona - CM

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारा गणेशोत्सव हा सामाजिक भान राखत शांततेने साजरा करावा. याकाळात गर्दी होणार नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

तसेच कोरोना युद्धाच्या मध्यावर आपण काही ठिकाणी शिखराकडे गेलो. तर, काही ठिकाणी जात आहोत. त्यामुळे गाफील न राहता आतापर्यंत ज्या उपाययोजना सुरू आहेत. त्या यापुढेही नेटाने राबवाव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

गणेशोत्सव, राज्यातील कोरोना उपाययोजना यांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली.

या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, राज्य टास्क फोर्सचे सदस्य सहभागी झाले होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्हानिहाय कोरोना उपाययोजना आणि मृत्यूदर यासंदर्भात आढावा घेतला.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोरोनामुळे सर्वधर्मियांनी आतापर्यंतचे सगळे सण साधेपणाने घरातच साजरे करून शासनाला सहकार्य केले आहे. याप्रमाणेच आता येऊ घातलेला गणेशोत्सव आणि मोहरम हे गर्दी न करता साजरे करावेत.

गणेशोत्सवासंदर्भात गृहविभागाने मार्गदर्शक सुचनांचे परिपत्रक निर्गमित केले आहे त्यातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

सार्वजनिक गणेश मंडळांसाठी गणपतीची मूर्ती 4 फुटांची तर घरगुती गणेश मुर्ती 2 फुटांची असावी असे या मार्गदर्शक सुचनांमध्ये नमूद केले आहे. त्याचे पालन करतानाच आगमन आणि विसर्जन मिरवणूका निघणार नाहीत.

गणेशोत्सवात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेणे अत्यावश्यक असून गृह विभागाचे परिपत्रक सर्व संबंधितांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी टाळावी

या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन शक्यतो घरीच करावे, जिथे शक्य नाही तिथे मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलाव निर्माण करावेत व तेथेही गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन विसर्जनाची व्यवस्था करण्यात यावी. महापालिका यंत्रणेकडे गणेश मूर्ती दान करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.