Mumbai News : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आता पुण्यातही लक्ष घालणार

एमपीसी न्यूज – राज्यात काँग्रेस – राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यपालांचे महत्व कमालीचे वाढले आहे. पुणे महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता आहे. या ठिकाणीही राज्यपालांनी लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून भेटीची मागणी करणारे चित्रपट निर्माते नीलेश नवलाखा यांनी मंगळवारी राज्यपालांची भेट घेतली. पुणे महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांप्रकरणी प्रशासनाला विचारणा करून, कारवाई करण्यासंबंधी सूचना करेन, असे राज्यपालांनी यावेळी त्यांना सांगितले.

प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौटच्या बेकायदा बांधकामावर मुंबई महापालिकेने केलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी लक्ष घातले होते. त्यानंतर नवलाखा यांनीही राज्यपालांची भेट घेतली.

आपण मराठी चित्रपट निर्माता आणि बांधकाम व्यावसायिक आहे. हडपसर येथे सुरू असलेल्या प्रकल्पाभोवती बेकायदा बांधकाम होत‌ आहेत. तक्रारी करूनही कारवाई झालेली नाही. कायदेशीर मार्गाने व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घ्यावे,’ असे पत्र नवलाखा यांनी राज्यपालांना पाठवले आहे.

तर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी राज्यातील आठ लाख कलाकारांच्या व्यथाही राज्यपालांसमोर मांडल्या. महाराष्ट्र सरकारने कलाकारांसाठी एक स्वतंत्र मंडळ तयार करून कलाकारांच्या आरोग्य विम्याचा आणि घरांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी भोसले यांनी यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.