Mumbai News: आजी, माजी सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करमाफी – हसन मुश्रीफ

ग्रामविकास विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय : Gram Panchayat property tax exemption for ex-armymen - Hasan Mushrif

एमपीसी न्यूज – राज्यातील आजी आणि माजी सैनिकांना ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करातून माफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. यासंदर्भातील शासन निर्णय ग्रामविकास विभागामार्फत काल निर्गमित करण्यात आला असून देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या राज्यातील सर्व आजी, माजी सैनिकांसाठी हा निर्णय लागू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्याचे कृषी आणि माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी या मागणीसंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यांच्या विनंतीस अनुसरुन हा निर्णय घेण्यात आला.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, संरक्षण दलातील शौर्य पदकधारक, सेवा पदकधारक यांना तसेच अशा पदकधारकांच्या विधवा किंवा त्यांच्या अवलंबितांना त्यांच्या वापरात असणाऱ्या एका निवासी इमारतीस ग्रामपंचायत मालमत्ता करातून माफी देण्याची तरतूद आहे. आता ही तरतूद व्यापक करुन राज्यातील सर्व आजी, माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या आजी, माजी सैनिकांनी देशासाठी प्राणाची बाजी लावून जीवाची पर्वा न करता निःस्वार्थपणे देशाचे संरक्षण केले आहे.

त्यांनी केलेली देशाची सेवा विचारात घेता सर्व आजी, माजी सैनिकांना भावनिक दिलासा देणे व त्यांचे मनोबल उंचावून त्यांना उचित सन्मान देण्याच्या अनुषंगाने शासनाने हा निर्णय घेतला, असे मंत्री मुश्रीफ म्हणाले.

अशा करमाफीस पात्र ठरणाच्या व्यक्तींनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.