Mumbai News: ‘या’ प्रकरणात अजित पवारांसह 69 जणांना क्लीन चीट
एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँकेतील कथित घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला आहे. या घोटाळ्यात नाव असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वपक्षीय 69 जणांना या अहवालात क्लीन चिट देण्यात आली आहे. दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने या ‘क्लोजर रिपोर्ट’ला विरोध केल्याचे सांगितले जात आहे. याबाबतचे वृत्त मराठी वाहिन्यांनी दिले आहे.
शिखर बँकेत 25 हजार कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीने संचालक मंडळावर ठपका ठेवला होता. संचालक मंडळाने नियमांचे उल्लंघन करत कर्जवाटप केल्याने बँकेला आर्थिक फटका बसल्याचे अहवालात नमूद केले होते.
अजित पवार, हसन मुश्रीफ, विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ यांच्यासह विविध पक्षांतील 69 बड्या नेत्यांचा या संचालक मंडळात समावेश होता. रिझर्व्ह बँकेने यात हस्तक्षेप करत हे संचालक मंडळ बरखास्त केले होते. चौकशीचे आदेश दिले होते.
या कथित घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांसह 69 जणांवर कलम 420, 506, 409, 465 आणि 467 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला आहे. त्या अहवालात अजित पवारांसह 69 जणांना क्लीन चिट देण्यात आली आहे.
त्यामुळे अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.