Mumbai News : वर्षा निवासस्थानी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना, ‘अमंगल नष्ट होवो’ मुख्यमंत्र्यांची प्रार्थना

एमपीसी न्यूज – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. ‘जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो, अशी प्रार्थना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणरायाच्या चरणी केली. आज वर्षा येथे मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्रीगणेश प्रतिष्ठापना करण्यात आली, यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या संकटातून आपली मुक्तता व्हावी, म्हणून आपण सर्वानी एक जबाबदार नागरिक म्हणून प्रयत्न करायला हवेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आजपासून श्री गणरायाचं आगमन होत असून, जे जे काही अमंगल आहे ते नष्ट होवो अशी प्रार्थना मी आजच्या दिवशी गणरायाच्या चरणी करतो. आज केवळ महाराष्ट्रातच नाही तर, जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथं अगदी परदेशात देखील श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा मनोभावे केली जाते.

सलग दुसऱ्या वर्षी देखील आपण कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करतोय. एरव्ही गणेशोत्सव म्हटला की, गर्दी आणि धुमधडाक्यातला जल्लोष असं चित्र असायचं. मात्र दोन वर्षापासून कोरोनाने आपल्या पायात बेड्या अडकवल्या आहेत. कितीही मनात असलं तरी आपल्याला काही गोष्टींवर बंधनं आणावी लागत आहेत. शेवटी उत्सवापेक्षा लोकांच्या जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देणे हे सरकार म्हणून आमचं कर्तव्य आहे.

गणरायाला विघ्नहर्ता असं म्हणतात. तो हे संकट कायमचं दूर करेल, अशी मला खात्री आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणले की, लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध जनतेच्या मनातल्या असंतोषाला तोंड फोडण्यासाठी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले होते, आज आपण सर्वांनी तसेच विविध मंडळ, संस्था यांनीदेखील कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या महामारीतून आपली मुक्तता व्हावी म्हणून प्रयत्न करायला हवेत. एक जबाबदार नागरिक म्हणून कोरोनाविरुद्ध प्रखर आंदोलन आपण सुरू करूयात ही शपथ आजच्या या मंगल दिनी घेऊयात असेही आवाहन त्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.