Mumbai News : सर्वांशी चर्चा करून नव्याने अधिसूचना जारी करा ; फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

एमपीसी न्यूज – राज्यात 30 एप्रिलपर्यंत वीकेंड लॉकडाऊन आणि अन्य दिवशी कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप नोंदवला आहे. सरकारचे निर्बंध एकप्रकारे महिनाभराचा अघोषित लॉकडाऊन आहे. यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता वाढत चालली असून याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. सर्वच घटकांशी चर्चा करून पुन्हा नव्याने अधिसूचना जारी करण्यात यावी, अशी मागणी फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढतोय आणि त्यामुळे कठोर निबंध लावावे लागतील, असा आपला दूरध्वनी मला आला होता. दोन दिवसांचा लॉकडाऊनचा विषय असल्याने आम्ही सहमती दर्शविली.

मात्र, ज्याप्रकारे इतरही पाच दिवस लॉकडाऊनसदृश निर्बंध घालण्यात आलेत, त्यामुळे जनमानसात कमालीची अस्वस्थता आहे. काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करताहेत.

हे निबंध घालताना विविध क्षेत्रांचा विचार अजिबात करण्यात आलेला नाही. अनेक क्षेत्रांना या लॉकडाऊनचा मोठा फटका बसत असून, अर्थव्यवस्थेलाही त्यामुळे मोठा फटका बसत आहे. ज्या प्रकारचे निबंध प्रत्यक्षात लादण्यात आलेत, ते पाहता हा एकप्रकारे अघोषित महिनाभराचा लॉकडाऊनच आहे.

त्यामुळे रिटेलर्स, छोटे दुकानदार, छोटे हॉटेल्स, केश कर्तनालय अशा सर्व घटकांचा विचार होणे आवश्यक आहे. अनेक बाबतीत संलग्नता पाहण्यात आलेली नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर वाहतूक खुली ठेवताना गॅरेज आणि स्पेअर पार्टस दुकाने मात्र बंद ठेवण्यात आली आहेत. असेच प्रकार अनेक बाबतीत झाले आहेत.

त्यामुळे पुन्हा एकदा सर्व छोट्या-छोट्या घटकांशी चर्चा करून त्यांना दिलासा देण्यात यावा. सर्वांना विश्वासात घेऊन गरिबांचे जीवन आणि अर्थकारण दोन्हीही प्रभावित होणार नाही, अशा पद्धतीने नव्याने निर्बधांबाबतची अधिसूचना जारी करण्यात यावी.

कोरोनाला रोखणे महत्त्वाचे आहेच, पण कोरोना रोखताना अन्य मानवनिर्मित कारणांमुळे नागरिकांच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल, अशी कृती होता कामा नये. आपण तत्काळ यासंदर्भात पाऊले उचलाल, असा विश्वास वाटतो, असे फडणवीस यांनी पत्रात नमूद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.