Mumbai News : महाराष्ट्राला सलग तिसऱ्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात सर्वाधिक पुरस्कार-एकनाथ शिंदे

स्वच्छ भारत अभियानाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राची घोडदौड कायम

एमपीसी न्यूज – नागरी स्वच्छता अभियानातील कामगिरीत सातत्य राखत महाराष्ट्राने यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये देशातील सर्वाधिक पुरस्कार मिळवून महाराष्ट्राने आपली घोडदौड कायम राखली आहे, असे प्रतिपादन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

नवी दिल्ली येथे केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या उपस्थितीत झालेल्या या ऑनलाईन सोहळ्यास महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री शिंदे, राज्यमंत्री प्रसाद तनपुरे, लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, नगरविकास विभागाच्या तत्कालिन प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, प्रधान सचिव महेश पाठक आदी यावेळी उपस्थित होते.

मंत्री शिंदे म्हणाले की, नागरी स्वच्छता अभियानातील राष्ट्रीय 12 पुरस्कारांपैकी सर्वाधिक 4 पुरस्कारांसह अन्य 13 असे एकूण 17 पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत. मोठ्या राज्यांच्या मानांकनात महाराष्ट्राला दुसरा क्रमांक मिळाला आहे.

सलग तिसऱ्या वर्षी देशातील सर्वाधिक पुरस्कार मिळवत महाराष्ट्राने यंदा हॅट्रीक साधली आहे. सलग तीनही वर्षी देशात सर्वाधिक पुरस्कार मिळवत महाराष्ट्र देशात अग्रेसर राहिला आहे.

याबद्दल सर्व महापौर, नगराध्यक्ष, आयुक्त, मुख्याधिकारी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या टीमचे विशेष कौतुक नगरविकासमंत्र्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.