Mumbai News : एन 95 मास्क 19 ते 49 रुपयांना तर दुपदरी आणि तीनपदरी मास्क 3 ते 4 रुपयांना मिळणार – राजेश टोपे

एमपीसी न्यूज – राज्यात आता एन 95 मास्क 19 ते 49 रुपयांपर्यंत तर दुपदरी आणि तिनपदरी मास्क 3 ते 4 रुपयांना मिळणार आहे. आज याबाबत राज्य शासनाने शासन निर्णय जाहीर केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. विविध दर्जाच्या मास्कची विहित केलेली अधिकतम विक्री मुल्य मर्यादा ही साथरोग कायदा अंमलात असेपर्यंत लागू राहणार आहे.

हॅण्ड सॅनिटायझर व मास्क यांच्या किमतीत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याने त्याचा भुर्दंड सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार सॅनिटायझर व मास्कचे दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने दर निश्चित करण्यापूर्वी उत्पादक कंपन्यांशी चर्चा केली.

उत्पादक, पुरवठादार व वितरक यांचे उत्पादन क्षेत्र, कार्यालय, गोदाम यांना प्रत्यक्ष भेट दिली तसेच उत्पादित मालाच्या उत्पादनाचा खर्च व त्याची नक्त किंमत परिव्यय लेखा परिक्षक यांच्या सहाय्याने निर्धारित केली आहे.

विक्री मूल्याची मर्यादा राज्यातील सर्व मास्क उत्पादक कंपन्या व विक्रेत्यांना लागू राहील तसेच, मास्कचा दर्जा व त्याची निर्धारित कमाल विक्री किंमत दर्शनी भागावर लावणे आवश्यक राहील.

रुग्ण सेवा देणाऱ्या महाराष्ट्रातील शासकीय व खाजगी रुग्णालये, नर्सिंग होम, कोवीड केअर सेंटर, डेडीकेटेड कोवीड हॉस्पिटल्स इ. यांना मास्कचा पुरवठा करताना मास्कच्या विहित अधिकतम विक्री मूल्य मर्यादेच्या 70 टक्के दराने उपलब्ध करून देणे आवश्यक राहील.

खाजगी रुग्णालयांनी उपरोक्त दराने मास्कची खरेदी केल्यानंतर खरेदी किंमतीच्या 110 टक्के पेक्षा जास्त रक्कम रुग्णांकडून आकारता येणार नाही, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.