Mumbai News : अर्णबमुळेच अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली, नाईक कुटुंबीयांचा आरोप

एमपीसी न्यूज – अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी (दि.4) अलिबाग पोलिसांनी अटक केली त्यानंतर, अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी अर्णब गोस्वामी यांच्यामुळेच नाईक यांनी आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे.

अन्वय नाईक यांनी सुसाइट नोटमध्ये तीन जणांची नावं लिहून ठेवली होती. तरीदेखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. आज महाराष्ट्र पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. त्यांच्या कार्याला मी मनापासून सलाम करते, अशी प्रतिक्रिया अन्वय यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर नाईक कुटुंबीयांनी एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. त्यावेळी त्या बोलत होत्या. ‘माझ्या वडिलांनी आणि आजीने 5 मे 2018 रोजी आत्महत्या केली. माझ्या वडिलांच्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी यांचं नाव आहे, तसंच, फिरोज शेख, नितीश सार्डा या तिघांचीही नावं आहेत तरीही कारवाई का केली गेली नाही? सुशांत सिंह प्रकरणात अर्णब गोस्वामी यांनी आवाज उठवला. त्या प्रकरणात तर कोणतीही सुसाईड नोट नव्हती. परंतु माझ्या बाबांच्या सुसाईड नोटमध्ये नाव असूनही कोणतीही कारवाई झाली नाही,अर्णब गोस्वामी यांच्यामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला,’ असा आरोप अन्वय नाईक यांच्या कन्या अज्ञा नाईक यांनी केला आहे.

अर्णब यांनी सूडबुद्धीने हे सर्व केलं आहे. माझ्या पतीला पैसे मिळाले असते तर ते आज जिवंत असते. रिपब्लिकने आमचे 83 लाख रुपये थकवले आहेत. इतर कंपन्यांकडून ही देणं बाकी होतं. पण अर्णबनं इतरांनाही आमच्याविरोधात भडकावलं. त्यांनाही आमचे पैसे देऊ नका असं सांगण्यात आलं. त्यामुळे आमचे कामगार सोडून चालले होते. इतर कामंही मिळत नव्हती. आम्ही अनेकदा त्यांना विनंती केली, असं अक्षता नाईक यांनी म्हटलं आहे.

रिपब्लिक स्टुडिओ हा त्यांचा शेवटचा प्रोजेक्ट होता. प्रोजेक्टनंतर त्यांना त्यांची देय रक्कम देण्यात आली नाही. आम्ही वारंवार त्यांच्याकडे पैसे परत देण्याची मागणी केली पण, तरीही आम्हाला पैसे देण्यात आले नाही. आम्ही स्टुडिओमध्येही जाऊन अर्णबला भेटण्याची परवानगी मागितली पण तेव्हाही आम्हाला त्याला भेटून देण्यात आलं नाही, असा आरोप अन्वय यांच्या पत्नी आणि मुलींनं केला आहे.

गोस्वामी यांचा जबाब पोलीस उपमहासंचालकांच्या कार्यालयात नोंदवण्यात आला. अर्णब गोस्वामीला व्हिआयपी ट्रिटमेंट का? आम्ही पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनाही पत्र पाठवली होती, असंही अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता यांनी सांगितलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.