Mumbai News : ड्रग्ज प्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयास एनसीबीचं समन्स, चौकशी सुरू

एमपीसी न्यूज – राज्याचे अल्पसंख्याक व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून समन्स बजीवण्यात आली असून, त्यांची चौकशी सुरु आहे.

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर करण सजनानीच्या चौकशीदरम्यान समीर खान यांचं नाव समोर आले होते. त्यानंतर हे समन्स बजावण्यात आले व त्यानुसार समीर खान यांची चौकशी सुरु आहे.

उपलब्ध माहितीनुसार, एनसीबीने वांद्रे येथून ब्रिटीश नागरिक करण सजनानी आणि बॉलीवूड अभिनेत्रीची पूर्व मॅनेजर राहिला फर्निचरवाला यांना गांजासह अटक केली होती. यावेळी करण सजनानी याच्याकडून मुच्छड पानवाल्याला गांजा पुरवला जात होता अशी माहिती चौकशीत समोर आली. राहिला फर्निचरवालासुद्धा मदत करत होती असं एनसीबीचं म्हणणं आहे. यानंतर एनसीबीकडून सोमवारी मुच्छड पानवाल्याची चौकशी करण्यात आली आणि नंतर अटकेची कारवाई झाली.

समीर खान यांच नाव समोर आल्यानंतर मंगळवारी (12 जानेवारी) रात्री आठच्या सुमारास एनसीबीच्या एक टीमने वांद्र्यात जाऊन समीर खान यांना समन देऊन चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. त्यानुसार समीर खान आज (13 जानेवारी) सकाळी साडेआठ वाजता चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात हजर झाले. सध्या त्यांची चौकशी सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.