Mumbai News: राज्यात आता स्वीट मार्टमधील खुल्या मिठाईच्या ट्रेवरही टाकावी लागणार ‘एक्सपायरी डेट’!

उच्च न्यायालयानेही केले निर्णयाचे समर्थन, याचिका फेटाळून याचिकाकर्त्याला सुनावला एक लाखांचा दंड

एमपीसी न्यूज – स्वीट मार्टमधील खुल्या मिठाईच्या ट्रेवरही एक्सपायरी डेट टाकणे बंधनकारक करणारा एफएसएसएआयचा निर्णय लोकांच्या हिताचाच आहे, या शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने त्याबाबतच्या निर्णयाचे समर्थन केले. या निर्णयाच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेली जनहित याचिका नामंजूर करून याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयाने एक लाखाचा दंड सुनावला

राज्यभरातील मिठाईच्या दुकानात खुली विक्री करण्यात येणा-या मिठाईवर ती कधीपर्यंत खाण्यास योग्य आहे याची तारीख लिहीणे  1 ऑक्टोबरपासून बंधनकारक करण्यात आले आहे.

मुंबईतील मिठाई विक्रेत्यांच्या संघटनेने या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

ही याचिका विनाकारण दाखल करण्यात आल्याचा शेरा मारत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. दंडाची रक्कम कोविड केअर सहायता निधीत जमा करण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांना देण्यात आले आहेत.

खराब झालेली मिठाई आणि खाद्यपदार्थ ग्राहकांना विकण्यात आल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. मिठाईच्या दुकानांत विकण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या ट्रेवर पॅकेज फूडप्रमाणे ते कोणत्या तारखेपर्यंत खाण्यास योग्य आहेत त्याची तारीख ठळकपणे लिहीणे बंधनकारक असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

त्याबाबत सर्व मिठाई विक्रेत्यांना 24 फेब्रुवारीला नोटीस जारी करून कल्पना दिली होती. जनतेच्या हितासाठी 25 सप्टेंबरला यासंदर्भात आदेश जारी करत ‘बेस्ट बिफोर’ ची तारीख सर्व भारतीय पद्धतीच्या खुल्या खाद्यपदार्थांवर लिहीणे 1 ऑक्टोबरपासून सक्तीचे केले.

प्रशासनाचा हा निर्णय मनमानी असल्याचा आरोप करत मुंबईतील मिठाई विकेत्यांच्या संघटनेने 2006 च्या अन्न सुरक्षा आणि दर्जा कायद्याअंतर्गत या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले होते. या जनहित याचिकेत केलेला दावा फोल असून त्यातून जनतेच्या हितासाठी घतलेल्या एका योग्य निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे, असे मत नोंदवत उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली. त्याच बरोबर याचिकाकर्त्यांना आर्थिक दंडही सुनावला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.