Mumbai News : …आता पर्यटकांसह क्रीडाप्रेमींना ‘वानखेडे स्टेडियमची सफर’

एमपीसी न्यूज – पर्यटक तसेच क्रीडाप्रेमींसाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियम लवकरच खुले करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. भारताने 2011 मध्ये वानखेडे स्टेडियमवर विश्वचषक पटकावला होता. त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी यानिमित्ताने पर्यटकांसह क्रीडाप्रेमींना मिळणार आहे.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर वानखेडे स्टेडियम मार्च महिन्यापासून बंद आहे. परंतु आदित्य यांच्या विनंतीनुसार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सादर केलेला ‘वानखेडे स्टेडियम सफर’चा प्रस्ताव मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) स्वीकारल्यामुळे लवकरच हे स्टेडियम खुले करण्यात येणार आहे. पर्यटक आणि क्रीडाप्रेमींना स्टेडियमची सफर करता यावी, हा उद्देश यामागे आहे. या उपक्रमांतर्गत स्टेडियममध्ये क्रिकेटचे संग्रहालय बनवण्यात येणार असून जगभरातील चाहत्यांना तसेच पर्यटकांना याचा लाभ घेता येणार आहे.

‘एमसीएने पर्यटकांसाठी स्टेडियम खुले करण्याचा प्रस्ताव मान्य केल्याने मी त्यांचा आभारी आहे. वानखेडेवर भारताने विश्वचषक जिंकला आहे. या स्थितीत हे स्टेडियम प्रत्येक क्रिकेटप्रेमीसाठी महत्त्वपूर्ण आहे’ असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. परदेशात क्रिकेट, फुटबॉल, टेनिस यांसारख्या स्टेडियमना पर्यटनस्थळांप्रमाणे दर्जा आहे. त्या ठिकाणी सामने नसताना पर्यटकांना त्या स्टेडियमची सफर करता येते. पर्यटक भेट देत असल्याने संबंधित स्टेडियमना महसूल मिळण्यासही मदत होते. भारतामध्ये सध्या धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेकडून पर्यटकांना स्टेडियम पाहण्याची संधी देण्यात येते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.