Mumbai News : राज्यात 5 ते 6 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध ; रक्तदान करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मागील वर्षीप्रमाणे पुन्हा एकदा रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. राज्यात सध्या 5 ते 6 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे सर्व रक्तपेढी, स्वयंसेवी संस्था आणि राजकीय नेते यांनी पुढाकार घेऊन आपल्या विभागात रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. जनतेनेही रक्तदानासाठी पुढे यावे व रक्तदान करावे, असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात नेहमीच रक्ताचा तुटवडा भासतो. आता रुग्णालयांमध्ये कोविड आणि नॉन कोविड अशा दोन्ही रुग्णांवर उपचार केले जात असल्याने अधिकाधिक रक्तदात्यांची आवश्यकता आहे. त्यातच कोविड – 19 प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 28 दिवसापर्यंत रक्तदान करता येणार नसल्याने दुहेरी संकट निर्माण होणार आहे. म्हणून कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेण्यापूर्वी रक्तदात्यांनी रक्तदान करणे गरजेचे आहे, असे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.

लोकांनी सरकारच्या आवाहनाला नेहमी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे निश्चितच जनता रक्तदानासाठी पुढे येवून रक्तदान करणार आहे. जनतेच्या प्रतिसादामुळे रक्ताची कमतरता भासणार नाही. तरी नागरिकांनी रक्तदान करावे व इतरांचे जीवन सुंदर बनवावे, असे आवाहनही डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.