Mumbai News: एसटी बसमधून पूर्ण आसनक्षमतेने प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी

प्रवाशांना मास्क व सॅनिटायझरचा वापर बंधनकारक

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी बसमधून होणाऱ्या प्रवासी वाहतुकीवरील निर्बंध राज्य शासनाने हळूहळू कमी केले आहेत. उद्यापासून (शुक्रवार) पूर्ण आसनक्षमतेने प्रवासी वाहतूक करण्यास राज्य शासनाने एसटीला परवानगी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. ही परवानगी देताना प्रवाशांना मास्क व सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.

कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी देशभर लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे 23 मार्चपासून एसटीची बससेवा बंद होती. 20 ऑगस्टपासून आंतरजिल्हा वाहतुकीला तर दोन दिवसांपासून आंतरराज्य वाहतुकीलाही परवानगी मिळाली आहे. मात्र, एका सीटवर एकच प्रवासी अशा पद्धतीने 50 टक्के आसनक्षमतेने प्रवासी वाहतुकीची अट घालण्यात आली होती.

आता राज्य शासनाने एसटीला पूर्ण आसनक्षमतेने प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली आहे. त्याला प्रवाशांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.