Mumbai News : पिंपरी-चिंचवडमधील उद्योजकाला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील उद्योजकाला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. कोट्यावधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आली आहे. 

रविराज विकास ताकवणे असे अटक केलेल्या उद्योजकाचे नाव आहे. ताकवणे हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका नंदा ताकवणे यांचा मुलगा आहे. 27 एकर जागेच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात 13 कोटी 91 लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी श्रीप्रकाश विजयकुमार सरदेसाई (रा. मलबार हिल, मुंबई) यांनी याप्रकरणी मलबार हिल पोलिसात गुन्हा नोंदवला आहे. ताकवणे याला अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

फिर्यादी यांच्या कुटुंबीयांची पिंपरी चिंचवड एमआयडीसीमध्ये 27 एकर जागा होती. ही जागा एमआयडीसी कडून रीतसर हस्तांतरित करून घेण्यात आली होती. कंपनीचे मूळ मालक विनायक सरदेसाई यांचे निधन झाले. त्यांची मुले विदेशात असल्याने त्यांनी या जागा विक्रीचा निर्णय घेतला. त्यासाठी रविराज ताकवणे यांच्या बरोबर व्यवहार ठरला. त्यानुसार ताकवणे यांनी 27 एकराचे 14 कोटी 50 लाख रुपये टप्याटप्याने द्यायचे ठरले.

त्यानुसार दोघांमध्ये 5 मे 2019 रोजी परस्पर सामंजस्य करार करण्यात आला. प्रत्यक्षात ताकवणे यांनी केवळ 59 लाख रुपये दिले. उर्वरित 13 कोटी 91 लाख रुपये दिले नाहीत. याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.