Mumbai news: विनोद तावडे, पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन, राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी; एकनाथ खडसे यांना पुन्हा डावलले

एमपीसी न्यूज – भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आज (शनिवारी) जाहीर केली आहे. या नव्या कार्यकारिणीमध्ये विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे, तिकीट न मिळालेले माजी मंत्री विनोद तावडे यांची वर्णी लागली आहे. त्यांना राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी दिली आहे. तर, पक्षावर नाराज असलेले भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा डावलण्यात आले आहे. त्यांना कार्यकारिणीत कोणतेही स्थान देण्यात आलेले नाही.

भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रीय सचिव म्हणून माजी मंत्री विनोद तावडे, सुनिल देवधर, पंकजा मुंडे, विजया रहाटकर यांची नियुक्ती झाली आहे. याशिवाय राष्ट्रीय प्रवक्त्यांच्या यादीत खासदार हीना गावित यांना स्थान देण्यात आले आहे.

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव झाला होता. पराभव झाल्यानंतर पंकजा यांना विधान परिषद किंवा राज्यसभा कुठेच जागा मिळाली नाही.

तसेच गेले काही महिने त्या सक्रिय राजकारणापासून लांब होत्या. त्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चेला आणखी उधाण आले होते. मात्र, आता पक्ष कार्यकारिणीत मोठी जबाबदारी पंकजा यांच्याकडे देण्यात आली आहे.

माजी मंत्री विनोद तावडे यांना विधानसभेला तिकिट नाकारले होते. ‘तिकीट का नाकारले असे आपण पक्षाला विचारणार’, असे ते सांगत होते. आता त्यांनाही पक्षाने राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यांच्यासह महाराष्ट्रातील सुनील देवधर आणि विजया रहाटकर यांची नावे या यादीत आहेत.

पक्षावर नाराज असलेले एकनाथ खडसे यांच्या तोंडाला मात्र पक्षाने पुन्हा एकदा पाने पुसली आहेत. खडसे गेले काही महिने सातत्याने महाराष्ट्रात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात बोलत आहेत. आपल्याला मुद्दाम डावलल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली आहे.

केंद्रीय पातळीवरच्या भाजप नेतृत्वाने पुन्हा एकदा खडसेंकडे दुर्लक्ष केल्याचं दिसत आहे. मागील काही दिवसांपासून खडसे यांच्या पक्षांतराच्या वावड्या उडत आहेत. राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.