Mumbai News : लॉकडाऊनची तयारी करा ; तातडीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

एमपीसी न्यूज – वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध निर्बंध घातले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (रविवारी, दि.28) टास्क फोर्सकडून राज्यातील कोविड स्थितीचा आढावा घेतला. नागरिकांनी निर्बंध आणि नियमांचे कडक पालन केले नाही तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपविण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.

राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स आणि इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असल्याबद्दल टास्क फोर्सने चिंता व्यक्त केली. तसेच, मृत्यूचे प्रमाण वाढण्याची भीती देखील त्यांनी व्यक्त केली. नागरिक वेळीच चाचणी करून घेत नसल्याचे गंभीर परिणाम निदर्शनास येत असल्याचे फोर्सने नमूद केले.

मंत्रालयातील तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी घालावी तसेच खासगी कार्यालये व आस्थापना 50 टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.

ऑक्सिजन पुरवठा, खाटांचे प्रमाण त्वरेने वाढवावे. ग्रामीण भागात सुविधा नसतील तर नजीकच्या शहर व परिसरातील सुविधा मिळण्याची व्यवस्था करावी. केवळ मुंबई-पुण्यावर लक्ष केंद्रित न करता राज्याच्या सर्व भागात आरोग्य सुविधा कमी पडणार नाही हे पाहण्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी निर्देश दिलेत.

गृह विलगीकरण करण्यापेक्षा संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा. प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ मिळण्यासाठी खासगी डॉक्टर्सची सेवा घ्यावी. विशेषत: वृद्ध व सहव्याधी रुग्णांना प्राधान्याने उपचार मिळावेत. सहव्याधी असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रोम होम पद्धतीतून काम करू द्यावे अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.