Mumbai News : आज राज ठाकरे राजपालांची भेट घेणार !

एमपीसी न्यूज  : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत कोणत्या मुद्द्यावर चर्चा होणार हे अद्याप अस्पष्ट आहे. परंतु मागील काही दिवसांत राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व आहे. मंदिरे सुरु करण्यावरुन राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं होतं, या पत्रातून शिवसेनेला हिंदुत्वाची जाणीव करून दिली होती. त्यावरुन वाद निर्माण झाला होता.

राज ठाकरे लोकांच्या प्रश्नासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत अशी माहिती आहे.

लॉकडाऊन काळात अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी लोकांनी कृष्णकुंज गाठलं होतं, यात मुंबईचे डबेवाले, त्र्यंबकेश्वरचे पुजारी, ज्येष्ठ नागरिक, कोळी महिला, डॉक्टरांचे शिष्टमंडळ, महिला बचत गट अशा अनेक लोकांनी राज ठाकरेंकडे मदतीसाठी विनवणी केली होती. वेळोवेळी राज ठाकरेंनी या समस्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं.

ग्रंथालय सुरु करण्याबाबत राज ठाकरेंनी थेट संबंधित खात्याच्या मंत्र्यांना फोन करून प्रश्न मार्गी लावला होता. लॉकडाऊन काळात जीम चालक आणि व्यावसायिक यांनी राज ठाकरेंकडे गाऱ्हाणे मांडल्यानंतर राज ठाकरेंनी जीम सुरु करा, पुढचं मी बघतो असं विधान केले होते. त्यानंतर राज्यभरातील जीम हळूहळू सुरु करण्यात आल्या होत्या. राज्यातील मंदिरे सुरु करण्याबाबतही राज ठाकरेंनी सावध पवित्रा घेतला होता. आता राज ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत असल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.