Mumbai News : सरकारचं मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या दंडेलशाहीकडे दुर्लक्ष, राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

एमपीसी न्यूज – महाविकास आघाडी सरकारचं दोन विषयांकडे दुर्लक्ष होतं आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात मायक्रो फायनान्स कंपन्यांचा मुद्दा प्रकर्षाने मांडला आहे.

मार्च 2020 पासून कोरोना, लॉकडाउन आणि त्यातून निर्माण झालेलं आर्थिक अरिष्ट यामुळे राज्यातील महिला बचत गटांचे व्यवसाय जवळपास ठप्प आहेत. त्यामुळे मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्तेही थकले आहेत.

मात्र, परिस्थितीचा विचार न करता मायक्रो फायनान्स कंपन्यांनी दंडेलशाही सुरु केली आहे. या दंडेलशाहीवर अंकुश लावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी पत्रात केली आहे.

राज ठाकरे यांनी पत्रात पुढे असे म्हटले आहे की, मायक्रो फायनान्स कंपन्यांचे कर्जदाराच्या घरी जाऊन दमदाटी करणे, त्यांचा चारचौघात अपमान करणं असे प्रकार सर्रास सुरु आहेत.

या विषयांच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या दंडेलशाहीवर सरकारने अंकुश ठेवायला हवा, कर्जदाराच्या घरी जाऊन त्याची अब्रू चव्हाट्यावर आणण्याचा अधिकार या कंपन्यांना कुणी दिला ?, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

हा विषय गंभीर आहे. हे जर असंच सुरु राहिलं तर लक्षात ठेवा याचे मानसिक आणि सामाजिक परिणाम गंभीर असतील. सरकार म्हणून आता तरी जागे व्हा आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या अरेरावीला चाप बसवा.

हे सरकार म्हणून तुमच्याकडून होणार नसेल तर माझ्या महाराष्ट्र सैनिकांना त्यांच्या पद्धतीने कारवाई करावी लागेल, असाही इशारा या पत्रात राज ठाकरेंनी दिला आहे.

ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था देखील मागील सहा महिन्यांपासून ठप्प आहे. त्यामुळे महिलांना कर्जाचे हप्ते भरणे अवघड जात असून या महिलांचे कर्ज माफ करण्यासाठी देखील सरकारने पाऊले उचलावीत.

मायक्रो फायनान्स कंपन्यांनी बचत गटाच्या महिलांचा विमा उतरवतो या नावाखाली हप्ते गोळा केले पण हप्ते भरुनही त्यांना विम्याची कागदपत्रे मिळाली नाहीत. त्यामुळे या महिलांना विम्याची कागदपत्रे तर मिळावीच, पण विमा कवच देखील मिळावं, असं राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.