Mumbai News : खंडणी गोळा करण्याचे संस्कार आमच्यावर नाहीत; सचिन वाझेंनी केलेले आरोप मंत्री अनिल परब यांनी फेटाळले

एमपीसी न्यूज – ‘खंडणी गोळा करण्याचे संस्कार आमच्यावर नाहीत, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो हे खोटं आहे. माझी नार्को टेस्ट केली तरी मी सामोरा जायला तयार आहे, NIA, CBI, रॉ कुठलीही चौकशी लावली तरी मी तयार आहे’, असे म्हणत परिवहन मंत्री अनिल परब यांनी सचिन वाझेंनी केलेले आरोप फेटाळले आहेत.

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंची NIA तर्फे चौकशी सुरू आहे. वाझेंनी कोर्टापुढे हस्तलिखित पत्र सादर केलं आहे. त्यात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्याकडे 2 कोटींची मागणी केल्याचं वाझेनी सांगितलं आहे. वाझेंच्या जबाबामध्ये शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांचंही नाव आहे. अनिल परब यांनीही आपल्याला खंडणी वसून करायला सांगितलं, असा खळबळजनक आरोप वाझेंनी कोर्टापुढे सादर केलेल्या पत्रातून केला आहे.

जून, ऑगस्ट 2020 मध्ये SBUT ट्रस्टीकडून 50 कोटी गोळा करण्याचा आरोप अनिल परब यांच्यावर पत्राद्वारे करण्यात आला आहे. जानेवारी 2021 मध्ये मुंबई महापालिका कंत्राटदाराकडून 2 कोटी रुपये जमा करण्याच्या सूचना दिल्याचाही आरोप आहे.

_MPC_DIR_MPU_II

वाझेंनी पत्रात उल्लेख केलेत ते खोटे असल्याचं सांगत परिवहन मंत्री अनिल परब यांनी सगळे आरोप फेटाळले आहेत. ‘मला बदनाम करण्यासाठी केलेले आरोप आहे. भाजपचे पदाधिकारी आम्ही तिसरा बळी घेऊ म्हणत होते. त्यामुळे भाजपने रचलेलं हे प्रकरण आहे. वाझे हे पत्र देणार आहे हे भाजपला आधी पासून माहीत होतं’, असं अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांची शपथ घेऊन आणि माझ्या दोन्ही मुलींची शपथ घेऊन मी सांगतो की हे खोट आहे. मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांना बदनांकरण्याचा हा डाव आहे. माझी नार्को टेस्ट केली तरी मी सामोरा जायला तयार आहे. NIA, CBI, रॉ कुठलीही चौकशी लावली तरी मी तयार आहे’, असं परब म्हणाले.

भाजपचे पदाधिकारी आम्ही तिसरा बळी घेऊ म्हणत होते. ‘त्यामुळे भाजपने हे बनवलेलं प्रकरण आहे’ ‘वाझे हे पत्र देणार आहे, हे भाजपला आधीपासून माहीत होतं म्हणून ते गाजावाजा करत आहेत असे परब म्हणाले.

दरम्यान, वाझेंचं हे पत्र NIA कोर्टाने फेटाळलं असून ते अधिकृत पद्धतीने नोंदवावं, असं कोर्टाने सांगितलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.