Mumbai News :शिवसेना उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक यांनी घेतली राज्यपालांची सदिच्छा भेट

एमपीसी न्यूज : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि राज्याचे राज्यपाल यांच्यातील बहुचर्चित “लेटर बॉम्बनंतर” देखील राज्यमंत्री (द) महाराष्ट्र राज्य , भारतीय कामगार सेने चे सचिव व शिवसेना उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांना शिवसेनेवरील पुस्तक – “शिवसेना – अस्मिता, संघर्ष, वाटचाल” भेट दिले.

21 प्रकरणं असलेल्या या पुस्तकात शिवसेनेच्या मागच्या पन्नास वर्षांतील वाटचालीचा इत्यंभूत आढावा घेतलेला आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी पुस्तक हातात घेताच त्यातील काही पाने वाचली व हे पुस्तक इंटरेस्टिंग असल्याची प्रतिक्रिया दिली.

तीस मिनिटांच्या दीर्घ चर्चेत दोघांमध्ये शिवसेनेचे झंझावाती नेतृत्व बाळासाहेब ठाकरे यांच्यासह त्यांच्या करिष्म्याचा सेना-भाजप युतीला गेल्या दोन दशकात कसा फायदा झाला, यावर सविस्तर चर्चा झाली. कोश्यारी चर्चेदरम्यान विश्वासाने म्हणाले की, आज ना उद्या सेना-भाजप विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येतीलच.

शिवसेनेचे कामगार नेते रघुनाथ कुचिक यांनी शिवसेनेची कामगार चळवळ व त्याचा आजवर विविध क्षेत्रांना झालेला फायदा यांवर चर्चा केली. महाराष्ट्राच्या किमान वेतन धोरण सल्लागार समितीचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी कोश्यारी यांना किमान वेतन धोरण (मिनिमम वेज पॉलिसी) समजावून सांगितले. असंघटित तसेच आयटी क्षेत्रातील विविध अडचणी त्यांनी राज्यपालांपुढे मांडल्या. तसेच त्यांच्या सामाजिक सुरक्षेच्या मुद्द्यावरही चर्चा केली. त्याचबरोबर कोरोना काळ विशेषत मजूर वर्गासाठी किती कठीण होता, अधोरेखित केले.

कुचिक यांचे सहकारी राहुल बोहरा ,प्रफुल्ल सारडा यांनी भेटीचे उत्तम नियोजन केले. तसेच दोन वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांची ही भेट यशस्वीपणे पार पाडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.