Mumbai News : काही आयपीएस अधिका-यांनी सरकार पडण्याचा प्रयत्न केला? गृहमंत्र्यांच्या मुलाखतीतून निघालेला सूर

पण मी तसं म्हणालोच नाही, माझ्या विधानाचा विपर्यास केला - गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण

एमपीसी न्यूज – राज्यातील काही आयपीएस अधिका-यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, असा गौप्यस्फोट गृहमंत्र्यांनी केल्याचे एका माध्यम समूहाने घेतलेल्या मुलाखतीतून बाहेर आले. मात्र, मी तसे म्हटलेच नाही. माझ्या विधानाचा विपर्यास केला असल्याचे स्पष्टीकरण त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.

लोकमत या माध्यम समूहाने त्यांच्या एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमध्ये गृहमंत्री पदाची जबाबदारी, भीमा कोरेगाव प्रकरण, एल्गार परिषद प्रकरण, पोलीस भरती, आवडीनिवडी अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

त्याच मुलाखतीत गृहमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला की, सरकार पाडण्याचा आयपीएस अधिका-यांकडून प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली होती. नेमकं काय प्रकरण होत, कोण त्यात सहभागी होत, कुणाची नावे तुमच्या समोर आली आणि ते सगळं तुम्ही कसं हाताळलं?

या प्रश्नाचे उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले, “त्याबद्दल मला एकदम सांगता येणार नाही जाहीरपणे, पोलीस खात्यात सर्वच अधिकारी चांगले काम करीत आहेत. काही वेगवेगळ्या विचारांचे असतात. काहींचे नेत्यांशी जवळचे संबंध असतात, त्यामुळे त्यांची वक्तव्ये राहतात. पण त्याबद्दल मी जाहीर वक्तव्य करू शकत नाही.

आयपीएस अधिकारी अभिनव गुप्ता यांनी वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरला जाण्यासाठी कोरोनाच्या काळात पत्र दिले. याबाबतदेखील गृहमंत्र्यांना विचारण्यात आले. त्यावर गृहमंत्री म्हणाले, “गुप्ता यांच्याकडून त्यावेळी चूक झाली. ती चूक त्यांनी जाहीरपणे कबूल केली. गुप्ता यांचे आजवरचे काम पाहता ते उत्तम अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आता नवीन जबाबदारी दिली आहे.”

अशा पद्धतीने ही मुलाखत झाली आहे. त्यातून एक गौप्यस्फोट केल्याचे वृत्त प्रसारित झाले. त्या वृत्तात ‘काही आयपीएस अधिका-यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा गृहमंत्र्यांनी गौप्यस्फोट केल्याचे’ म्हटले.

यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘पोलिसांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता, असे मी म्हणालोच नाही. माझ्या तोंडी हे वाक्य टाकण्यात आले आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येईल.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.