Mumbai News : राज्यात 30 मार्चपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम

एमपीसी न्यूज – शैक्षणिक, सेवा, निवडणुक, इतर कारणांकरिता सन 2020-21 या वर्षात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. अशा विद्यार्थ्यांचे व अर्जदारांचे नुकसान होऊ नये, म्हणून पुणे येथील बार्टी कार्यालयाने सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना 15 ते 30 मार्च, 2021 या कालावधीत विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या विशेष मोहिमेअंतर्गत समितीकडील 6 महिन्यावरील सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या व ज्या प्रकरणांत त्रुटी आहेत, त्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांस व अर्जदारास त्यांच्या प्रकरणांतील त्रुटी पूर्तता करुन घेण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

तरी ज्या विद्यार्थ्यांना व अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र त्रुटीअभावी प्राप्त झालेले नाही, त्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी संबंधित जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी त्रुटी पूर्तता करण्यासाठी आवश्यक पुरावे व मुळ कागद पत्रासह संपर्क साधावा, असे आवाहन धम्मज्योती गजभिये, महासंचालक, बार्टी तथा मुख्य समन्वयक जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समित्या यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.