Mumbai News: उत्पन्नाचा स्त्रोत वाढविण्यासाठी एसटी महामंडळ सुरु करणार पेट्रोल पंप

Mumbai News: ST Corporation to start petrol pumps to increase source of income एसटीने पर्यायी उत्पन्नाचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे.

एमपीसी न्यूज – प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून महामंडळ लवकरच सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल आणि डिझेल पंप सुरु करीत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब यांनी दिली.

मंगळवारी (दि.18) सह्याद्री येथे परिवहन मंत्री परब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एसटी महामंडळ आणि इंडियन ऑइल यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने व एसटीच्या वरिष्ठ अधिकऱ्यांसह इंडियन ऑइलचे महाराष्ट्र प्रमुख अमिताभ अखवैरी, महाव्यवस्थापक राजेश जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या सामंजस्य करारानुसार भविष्यात राज्यातील एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागेवर 30 ठिकाणी पेट्रोल-डिझेल पंप आणि 5 ठिकाणी एल.एन.जी.पंप (Liquifid Natural Gas) सुरु करण्यात येणार आहे. या पेट्रोल-डिझेल पंप, एल.एन.जी. पंप इंडियन ऑइलकडून बांधण्यात येणार असून त्याचे संचालन एसटी महामंडळाकडून करण्यात येणार आहे.

अनिल परब म्हणाले, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असलेल्या प्रवासी तिकिटातून मिळणाऱ्या हजारो कोटीच्या उत्पन्नाला एसटीला मुकावे लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये एसटीने पर्यायी उत्पन्नाचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे.

यामध्ये प्रामुख्याने मालवाहतुकीसारख्या उपक्रमाला सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच टायर पुनर्स्थिरीकरण प्रकल्पातून देखील व्यावसायिक स्तरावर उत्पादन घेण्यास सुरुवात झाली आहे.

अशा अनेक उत्पन्न स्त्रोतांबरोबरच राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या एसटीच्या मोकळ्या जागेवर इंडियन ऑइलच्या सहकार्याने सर्वसामांन्यांसाठी पेट्रोल-डिझेल, एल.एन.जी. पंप उभारले जाणार आहेत. या विक्रीतून एसटी महामंडळाला कायमस्वरूपी उत्पन्नाचा एक स्थिर स्त्रोत निर्माण होईल, असा विश्वासही परब यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.