Mumbai News : मुद्रांक शुल्कात 31 मार्चपर्यंत सवलत पण, नोंदणीसाठी चार महिने मुभा

एमपीसी न्यूज – स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांतरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या तसेच भाडेपट्ट्याच्या दस्ताऐवजांवर शासनाने 31 मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्क सवलत जाहीर केली आहे. तथापि या सवलतीचा लाभ घेऊन हे दस्ताऐवज चार महिन्यांच्या आत नोंदणीसाठी सादर करता येतात, त्यामुळे निबंधक कार्यालयात गर्दी करु नये, असे आवाहन नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने केले आहे.

एक जानेवारी पासून 31 मार्च 2021 पर्यंत संपूर्ण राज्यासाठी देय मुद्रांक शुल्काचा दर 5 टक्क्यांवरुन 3 टक्के करण्यात आला आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी दि. 31 मार्च 2021 किंवा त्यापूर्वी मुद्रांक शुल्क भरावे व दस्तामधील पक्षकारांनी त्यावर स्वाक्षरी पूर्ण करावी; जेणेकरुन नोंदणी अधिनियमातील तरतुदीनुसार पुढील चार महिन्यात पक्षकारांना आपला दस्त नोंदता येईल.

शासनाने दि.01 सप्टेंबर 2020 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत संपूर्ण राज्यासाठी मुद्रांक शुल्कात सूट देऊन देय 5 टक्केऐवजी 2 टक्के दराने मुद्रांक शुल्क आकारणी लागू केली. त्याचप्रमाणे दि. 01 जानेवारी 2021 पासून 31 मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्काचा दर 3 टक्के लागू राहणार आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त्‍ा नोंदणीकरिता गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता, या सवलतीचा लाभ घेण्याकरिता मार्च 2021 अखेर दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी करु नये, असे आवाहन मुंबई शहर सह जिल्हा निबंधक उदयराज चव्हाण यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.