Mumbai News: सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे, पार्थ पवार म्हणाले…’सत्यमेव जयते’

Mumbai News: Sushant's death case to CBI probe, Partha Pawar says ... 'Satyamev Jayate' आजोबा शरद पवार यांनी फटकारल्यानंतरही पार्थ यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधी भूमिका घेतल्याने पार्थ यांच्या मनात नेमके काय चालले आहे, अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

एमपीसी न्यूज – अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी खळबळ उडवून दिली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविल्यानंतर पार्थ पवार यांनी ‘सत्यमेव जयते’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. आजोबा शरद पवार यांनी फटकारल्यानंतरही पार्थ यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधी भूमिका घेतल्याने पार्थ यांच्या मनात नेमके काय चालले आहे, अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे.


कोर्टाच्या या निकालावर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडेने प्रतिक्रिया देताना “अखेर सत्याचा विजय झाला. न्यायाच्या दिशेने पहिले पाऊल” अशा आशयाचं ट्विट केले. न्यायालयाच्या या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी अंकितानेही टि्वट करत ‘सत्यमेव जयते’ अशी प्रतिक्रिया नोंदवली होती. त्यावेळी माध्यमांमध्ये चर्चेला उधाण आले होते.


त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांनीही ‘सत्यमेव जयते’ असे ट्विट करत न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले आहे. यामुळे पार्थ यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे.

पार्थ यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. त्यावर शरद पवार यांनी, ‘माझा नातू अपरिपक्व आहे. त्याच्या मागणीला मी कवडीची किंमत देत नाही’ अशा शब्दांत पार्थला सार्वजनिकरित्या फटकारले होते. त्यावरुन मोठे वादळ निर्माण झाले होते.

सुशांतची घटना मुंबईत घडली आहे. त्याचा तपास करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत. त्यामुळे तपास सीबीआयकडे देण्यास सरकारचा विरोध होता. पण, न्यायालयाच्या निकालानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवानेच सत्यमेव जयते असे ट्विट करत सरकारविरोधी भूमिका कायम ठेवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.