Mumbai News : ‘तौक्ते’ चक्रीवादळ; महावितरणच्या यंत्रणेला सज्ज राहण्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांचे निर्देश

एमपीसी न्यूज – अरबी समुद्रातील ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा मुसळधार पावसासह मोठा तडाखा राज्यातील कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना बसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केल्यानंतर ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विविध बैठका आयोजित करून एक कृती आराखडा तयार केला. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणची यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले आणि मागील 3 दिवस ते सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

यासाठी विभागीय पातळीवर आणि जिल्हा पातळीवर त्यांच्या सुचनेनुसार नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले होते.

“गेल्यावर्षी कोकणात निसर्ग चक्रीवादळ आले तेव्हा ऊर्जामंत्री म्हणून मी प्रशासन आणि महावितरणचे कर्मचारी यांना सोबत घेऊन केलेल्या तयारीचा अनुभव गाठीशी होता. त्यामुळे यावेळेस अधिक सूक्ष्म नियोजन करता आले. वीज पुरवठा खंडित होऊ नये यासोबतच रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित होऊ नये हा अधिक प्राधान्याचा व चिंतेचा विषय होता. यासाठी मी गेल्या 3 दिवसापासून सतत बैठका घेत आहे. मी दिलेल्या सुचनेनुसार उच्चपदस्थ अधिकारिवर्ग रविवारी सकाळी 5 वाजतापासूनच नियंत्रण कक्षात बसून परिस्थितीवर लक्ष ठेवून होता. ऊर्जा सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महापारेषणचे उच्चपदस्थ अधिकारी यांच्याशी व्हीसीद्वारे मी नियमित संवाद साधला. दर दोन तीन तासांनी मी सर्व संबंधित अधिकारी वर्गाशी बोलून आढावा घेतला,” असे डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यास तो तात्काळ सुरळीत करण्यासाठी आपत्कालीन आराखडाही डॉ. राऊत यांच्या सूचनेप्रमाणे तयार करण्यात आला .त्याप्रमाणे युद्धपातळीवर काम करण्यात येत आहे की नाही यावर ऊर्जामंत्री सतत लक्ष ठेवून आहेत.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमिवर महावितरण कर्मचाऱ्यांसाठी ‘हाय अलर्ट’ जाहीर केला असून सर्व अभियंता व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी स्थानिक पातळीवर ताबडतोब पूर्वतयारी सुरु करण्याचे निर्देशही डॉ. राऊत यांनी दिले आहेत.

चक्रीवादळ व मुसळधार पावसामुळे वीजयंत्रणेचे कमीतकमी नुकसान व्हावे यासाठी पूर्वतयारी करण्यात आली. सोबतच महत्वाचे उपकेंद्र आणि भांडार केंद्रांमध्ये आवश्यक यंत्रसामग्रीचा साठा करून ठेवण्यात आला. यामध्ये विजेचे खांब, रोहित्र, वीजतारा, ऑईल व इतर तांत्रिक साहित्याचा समावेश आहे. यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी नियुक्ती करण्यात आलेल्या सर्व एजन्सीजना आवश्यक मनुष्यबळ, सामग्री व वाहनांसह तयार राहण्याचा सूचना देण्यात आल्या होत्या. नैसर्गिक आपत्तीमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यास सर्वप्रथम प्राधान्याने पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे सोबतच यंत्रणा दुरुस्तीचे काम देखील युद्धपातळीवर करण्याचे आदेश डॉ. राऊत यांनी दिले. सध्या कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीमुळे प्रामुख्याने मोठे व कोविड रुग्णालये, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प व रिफीलिंग उद्योग, विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्रे, पाणीपुरवठा, मोबाईल टॉवर्स, रेल्वे व अत्यावश्यक सेवेसह घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.