Mumbai News : मंदिर, लोकल, जिम बंदच तर मेट्रो कारशेड कांजुरमार्गला

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील मंदिर, लोकल, जीम बंदच राहणार आहेत तर आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी राज्यातील जनतेला संबोधित केले.

मला गर्दी नकोय, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत इतक्यात तरी लोकल पूर्ण क्षमतेने सुरु होणार नाही. राज्यातंर्गत रेल्वे वाहतूक सुरु केल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. लोकलची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे. ती मागणी मान्य झाल्यानंतर आणखी काही लोकांना लोकल प्रवासाची परवानगी देऊ असं त्यांनी सांगितलं. पण लॉकडाउनपूर्वी जशी लोकल सेवा सुरु होती, तशी लोकल सेवा कधीपर्यंत पूर्ववत होईल, याबद्दल त्यांनी काहीही सांगितलं नाही.

जीम सुरु करण्याची मागणी होत आहे, त्याबद्दल लवकर नियमावली आखून देऊ, असं ते म्हणाले. जीममध्ये व्यायाम करताना, हार्टचा पम्पिंग रेट जास्त असतो. त्यामुळे श्वासोश्वास वाढतो आणि त्यातून कोरोनाचा प्रसार होऊ शकतो असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मंदिर उघडण्याची मागणी होत आहे, त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, जबाबदारी तुमच्यावर नाही आमच्यावर आहे, त्यापेक्षाही जनतेवर आमचं प्रेम आहे. तगडयात तगड घालून मंदिर बंद ठेवायची आमची इच्छा नाही. उघडलेल्या दरातून समृद्धी आली पाहिजे कोरोना नको, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मेट्रोची कारशेड कांजुरमार्गला

मुंबईसाठी मोठा निर्णय सांगून मी लाईव्हची सुरूवात करतो, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे करण्यात येणार आहे, अशी घोषणा केली. आरेतील जंगलासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

आरेतील 600 एकर जमीन जंगल म्हणून केली आहे. त्याचबरोबर या जंगलाची व्याप्ती 800 एकर झाली आहे. त्याचबरोबर आरेतील कारशेड दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. आरेतील कारशेड आता कांजूरमार्ग येथे करण्यात येणार आहे. कांजूरमार्ग येथे ज्या ठिकाणी कारशेड उभारण्यात येणार आहे, ती जमीन सरकारची आहे. त्यामुळे जमिनीसाठी एक पैसाही द्यावा लागणार नाही. जनतेचा पैसा वापरण्यात येणार नाही.

या कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मेट्रो कर्मचाऱ्यांचे आभार मानतो, असं मुख्यमंत्री म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.