Mumbai News: कोरोनामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा- मुख्यमंत्री

Mumbai News: Time bound action plan to revive economy slowed down by corona- CM uddhav thackeray कोणताही विकास करतांना स्थानिकांशी संवाद साधणे आणि प्रकल्पाच्या बाबतीत पारदर्शीपणा आवश्यक असतो. यापूर्वी ते होत नव्हते.

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी नामवंत अर्थतज्ज्ञ, संशोधक यांनी केलेल्या शिफारशींमुळे निश्चितच राज्याच्या विकास दरात वाढ होण्यास मदत होईल, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालबद्ध रितीने या शिफारशीवर कृती करण्याच्या सूचना दिल्या व तसा आराखडा लगेच सादर करण्यास सांगितले.

महाराष्ट्राचा विकास दर कसा उंचवावा तसेच अर्थव्यवस्थेला कसा वेग द्यावा. यासंदर्भात पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या सदस्यांसमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली व अर्थतज्ज्ञांच्या शिफारशी ऐकून घेतल्या.

पुणे इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष रघुनाथ माशेलकर, उपाध्यक्ष विजय केळकर, दीपक पारेख, शमी मेहता, गौतम बंबवाले, विजय गोखले, प्रकाश आपटे, डॉ अभय पेठे, प्रदीप भार्गव, अजित रानडे, प्रशांत गिरबाने, रवी पंडित आदींची यावेळी उपस्थिती होती.

कोणताही विकास करतांना स्थानिकांशी संवाद साधणे आणि प्रकल्पाच्या बाबतीत पारदर्शीपणा आवश्यक असतो. यापूर्वी ते होत नव्हते, मात्र यापुढील काळात लोकांना विश्वासात घेतले जाईल. संवाद वाढविला जाईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, प्रकल्प आल्यावर प्रत्यक्ष स्थानिकांना रोजगार मिळत नाहीत. जमीन मालकाला योग्य किंमत मिळत नाही.

दलालांचा फायदा होतो, पर्यावरणाबाबतीत स्पष्टता नसते. मात्र आमचे शासन कोणताही प्रकल्प आणताना स्थानिक नागरिकांच्या मतांच्या बाहेर जाणार नाही. आंदोलने, अश्रूधूर, लाठ्या काठ्या यांच्या जोडीने विकास होत असेल तर त्याला अर्थ नाही. कोकण रिफायनरी आणि वाढवण बंदर यांच्या अनुषंगाने एका मुद्द्याला ते उत्तर देत होते.

समृद्धी महामार्गालगत विकास व्हावा
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा केवळ राजधानी आणि उपराजधानीला जोडणारा महामार्ग नसून तो राज्याच्या विकासाला गती देणारा आहे. यालगत 24 टाऊनशिप्स उभारण्यात येणार आहेत, शेती, औद्योगिक हब याठिकाणी असतील. त्यामुळे येणाऱ्या काळात या महामार्गालगत उद्योगांचे भक्कम जाळे पसरून त्याचाही लाभ राज्याला होणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, या अर्थतज्ज्ञानी केलेल्या शिफारशी महत्त्वाच्या असून मुख्यमंत्री सचिवालय पातळीवरून याचा विशिष्ट काळात सातत्याने आढावा घेतला तर निश्चितच उपयोग होईल.

डॉ. रघुनाथ माशेलर यांनी सांगितले की, बांधकाम क्षेत्र, मेगा प्रकल्प, आणि ईझ ऑफ डूईंग बिझिनेस यावर आम्ही भर देणार आहोत. शेवटी डॉ विजय केळकर यांनी नागरी सुधारणा, प्रशासनातील सुधारणा, न्यायिक यंत्रणेतील सुधारणा, आरोग्य धोरण या संदर्भात येणाऱ्या एक-दोन महिन्यात शिफारशी करणार आहोत असे सुतोवाच केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.