Mumbai News : लॉकडाउन टाळायचे असेल तर जनतेने नियम पाळायला हवेत – आरोग्यमंत्री टोपे

एमपीसी न्यूज – ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील वाढत्या रुग्ण संख्येवर चिंता व्यक्त केली आहे. जर कोरोना रुग्ण वाढत असतील, तर काही शहरात लॉकडाउन लावावं लागेल असे ते म्हणाले. आता कठोर निर्णय घ्यावे लागतील. लॉकडाउन टाळायचे असेल तर जनतेने नियम पाळायला हवेत.’ असं आवाहन आरोग्यमंत्री टोपे यांनी जनतेला केलं आहे.

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. टोपे म्हणाले, दररोज राज्यात तीन लाख लोकांचं लसीकरण होत आहे. खासगी ठिकाणं वाढवतो आहे व ग्रामीण भागात उपकेंद्रापर्यंत लसीकरणाच्या दृष्टीने लोकांना सुलभता व्हावी, यासाठी आम्ही व्यवस्था करतो आहे. आता 20 बेडेड हॉस्पिटलपर्यंत देखील लसीकरणाची व्यवस्था केली जात आहे. आमचा पूर्ण प्रयत्न आहे तीन महिन्यात लसीकरण कार्यक्रम पूर्ण संपवायचा. लसीकरणावर आम्ही विशेष लक्ष दिल्याचे त्यांनी नमूद केले.

कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा राज्यात रोज विक्रमी आकडा समोर येत आहे. यात विशेषकरुन मुंबई, पुणे, नागपूरची आकडेवारी चिंताजनक असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. राज्यात आज 2 लाख 10 हजार सक्रिय रुग्ण असून 85 टक्के लक्षण विरहित आहेत.

तर कोरोनामुळे होणारा मृत्यूदर 0.4 टक्के इतका आहे. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी राज्यात होत असल्याचेही टोपे यांनी सांगितले. सध्या पुरेशा प्रमाणात बेड उपलब्ध आहेत. मात्र, वाढती संख्या लक्षात घेता आणखी तयारी करावी लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.