Mumbai News : वीज खांबांपासून 30 मीटरच्या आतील अनधिकृत कृषीपंपांना मिळणार 26 जानेवारीपर्यंत अधिकृत वीज जोडणी

एमपीसी न्यूज : राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वीज खांबापासून 30 मीटरच्या आत असलेल्या सर्व अनधिकृत कृषिपंप वीज जोडण्यांना येत्या 26 जानेवारी पूर्वी अधिकृत जोडण्या देण्याचे महत्वपूर्ण आदेश दिले आहेत. याशिवाय येत्या 31 मार्चपर्यंत राज्यातील सर्वच अनधिकृत कृषी पंप वीज जोडण्यांना अधिकृत करण्याचा निर्णय डॉ. राऊत यांनी घेतला आहे.

राज्यात जवळपास 4 लाख 85 हजार अनधिकृत कृषिपंप वीज जोडण्या असून यापैकी किमान 30 टक्के अनधिकृत वीज जोडण्या या वीज खांबापासून 30 मीटरच्या आत आहेत. डॉ. राऊत यांनी मुंबईतील महावितरणाचे मुख्यालय, प्रकाशगड येथे महावितरणाच्या सर्व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीस उर्जा विभागाचे प्रधान सचिव आणि महावितरणाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीम गुप्ता, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ सूत्रधार कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे यांच्यासह सर्व संचालक, प्रादेशिक संचालक उपस्थित होते. बैठकीत राज्य मंत्रीमंडळाने अलिकडेच मंजूर केलेल्या कृषीपंप धोरणाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला गेला.

या निर्णयामुळे कित्येक वर्षे महावितरणाच्या कार्यालयात कृषीपंप वीज जोडणीसाठी खेटे घालणाऱ्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कृषीपंप वीज धोरणांस अलिकडेच मंजूरी मिळाली असून दरवर्षी एक लाख कृषीपंपांना वीज जोडण्या देण्यात येणार आहेत. या पंपांना योग्य दाबाचा पुरवठा मिळावा म्हणून पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी दरवर्षी 1500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.