Mumbai News : जेष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे निधन

एमपीसीन्यूज :  मराठी नाट्य – चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे आज, गुरुवारी सकाळी १० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी त्यांना आदरांजली वाहिली. 

खर्शीकर यांनी ‘बंदिवान मी या संसारी’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केला. त्यांचे ‘जसा बाप तशी पोरं’, ‘आई थोर तुझे उपकार’, ‘चालू नवरा भोळी बायको’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘लपवाछपवी’, ‘माफीचा साक्षीदार’ आदी चित्रपट गाजले.

रंगभूमीवरदेखील त्यांच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली. ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘वासूची सासू’, ‘अपराध मीच केला’, ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘लफडा सदन’ या त्यांच्या नाटकांना रसिकांनी डोक्यावर घेतले होते.

खर्शीकर यांनी चित्रपट, मालिका, रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम करुन आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या अनेक चित्रपट आणि नाट्यकलाकृतींना रसिकांची पसंती मिळाली. ‘दामिनी’ या लोकप्रिय मालिकेत ते झळकले होते. तसेच अन्य मराठी मालिकांमध्येही त्यांनी अभिनय केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.