Mumbai News : उत्तरप्रदेश पोलीस आणि प्रशासन नक्की काय लपवायचा प्रयत्न करत आहे ; राज ठाकरे यांचा सवाल

एमपीसी न्यूज – उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेली बलात्काराची घटना, त्यानंतर उपचाराच्या दरम्यान त्या मुलीचा झालेला मृत्यू हे मन विषण्ण करणारं आहे. पण, त्याहून अधिक भीषण प्रकार म्हणजे त्या मुलीचा मृतदेह तिच्या घरच्यांच्या ताब्यात न देता तिच्यावर परस्पर अंत्यसंस्कार करणं. उत्तरप्रदेश पोलीस आणि तिथलं प्रशासन नक्की काय लपवायचा प्रयत्न करत आहे? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरून प्रशासनाला मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागत आहे. दरम्यान राज ठाकरे यांनीही या प्रकरणावरून केंद्र आणि उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पत्रक पोस्ट करून याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

राज ठाकरे यांनी या हाथरस प्रकरणाचा निषेध करत. मुलीचा मृतदेह तिच्या घरच्यांच्या ताब्यात न देता तिच्यावर परस्पर अंत्यसंस्कार करुन उत्तरप्रदेश पोलीस आणि तिथलं प्रशासन नक्की काय लपवायचा प्रयत्न करत आहे? असा सवाल उपस्थित केला आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात असताना त्यांना अडवण्यात आलं. तसंच त्यांना पोलिसांनी धक्काबुक्की करून ताब्यात घेतलं. याचाही उल्लेख राज ठाकरे यांनी आपल्या पत्रकात केला.

‘पीडित मुलीच्या घरच्यांना कोणी भेटायला जात असेल तर त्यांना का अडवलं जात आहे? त्यांना धक्काबुक्की का केली जाते? नक्की कशाची भीती तिथल्या सरकारला वाटत आहे?’

‘महाराष्ट्रात एखादी घटना घडली तर स्वतःच स्वतला देशाचा आवाज घोषित करून त्यावर अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत? सर्व माध्यमं उत्तरप्रदेश सरकारवर आज का तुटून पडत नाही? त्यांना का जाब विचारला जात नाहीये?’

‘हाथरस मधली ही घटना पाशवी आहे, पण अशा घटना घडल्या की काही दिवस राग व्यक्त करायचा आणि पुढे शांत बसायचं हे होऊन चालणार नाही, यावेळेस अशा प्रवृत्तींच्या विरोधात, त्यावर अतर्क्य मागणाऱ्या कुठल्याही प्रशासनाला केंद्र सरकारने वठणीवर आणलेच पाहिजे’ असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.